Monday, April 21, 2025

झाडाचे दुःख

कथा – रमेश तांबे

एक आंब्याचं झाड होतं. भरपूर मोठं, चांगलं डेरेदार. त्याला भरपूर फांद्या होत्या. त्यावर असंख्य पानं होती. झाडाची सावली चांगली दिवसभर पडायची. झाडावर पक्ष्यांंची किलबिल असायची. गाई-गुरं भर दुपारी झाडाच्या थंडगार सावलीत बसायची. रस्त्याने येणारे-जाणारे वाटसरू दुपारच्या वेळी एक घटकाभर झाडाखाली आराम करून पुढच्या प्रवासाला निघायचे. सगळं कसं खूप छान होतं. पण झाड मात्र मनात कुढत बसायचं. त्याला एकच दुःख होतं, ते म्हणजे त्याला आंबे कधीच लागायचे नाहीत. मोहोरदेखील कधी यायचा नाही. त्यामुळे त्या मोहोराचा सुगंध, ते पिवळे धमक आंबे याचा अनुभव कधीही त्याला घेता आला नाही. आजूबाजूच्या झाडांना छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या की, पक्षी झाड सोडून तिकडे पळायचे. कैऱ्यांवर ताव मारायचे. हे बघून आंब्याच्या झाडाला खूप वाईट वाटायचं. त्याला वाटायचं आपला जन्म आंब्याचे झाड म्हणून झाला आहे. पण आपल्याला कधीच आंबे का येत नाहीत? असा प्रश्न ते स्वतःलाच विचारात बसे अन् डोळ्यांतून आसवे गाळत बसे.

एके दिवशी एक आजोबा कुबड्यांंचा आधार घेत हळूहळू चालत त्या झाडाजवळ आले आणि सावकाशीने सावलीत बसले. अंगात पांढरा शुभ्र सदरा, कमरेला धोतर, डोक्यावर टोपी, कपाळाला आणि कानांच्या पाळ्यांना गंध. त्यांच्याकडे बघून ते मोठे धार्मिक वृत्तीचे वाटत होते. ते मांडी घालून खाली बसले होते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. तोच त्यांच्या हातावर पाण्याचे थेंब पडू लागले. त्यांनी ओळखले की, हे अश्रू झाडाचेच आहेत. त्यांनी डोळे उघडले आणि ते झाडाला म्हणाले, “हे वृक्षा; हे झाडा! कसले दुःख करतोयस? तुझे अश्रू माझ्या हातावर पडत आहेत. तुला कसले दुःख आहे ते तरी सांग मला.”

मग झाड भरभरून बोलू लागलं. झाड म्हणाले, “आजोबा माझं मन तुम्हाला कळलं आहे. तुम्ही मोठ्या मनाचे आहात. चांगले आहात म्हणूनच मी तुम्हाला सांगतो. मी एवढा मोठा झालोय. पण मला फळेच येत नाहीत. बघा बाकीच्या झाडावर किती फळे येतात. ते बघून मला वाईट वाटतं.” झाडाचं बोलणं ऐकून आजोबा म्हणाले, “हे बघ झाडा; जे आपल्याला मिळालं त्यात सुख मानलं पाहिजे. आता हेच बघ इथे दिसणाऱ्या सर्व झाडांपेक्षा तूच मोठा आहेस. तुझ्या किती फांद्या, किती पानं! एवढी गाढ सावली फक्त तुझीच पडते. रस्त्याने येणारी-जाणारी माणसं तुझ्याच सावलीत बसतात. पक्ष्यांंची संख्यादेखील तुझ्याच अंगावर अधिक आहे. लहान मुलं तुझ्याच अंगा-खांंद्यावर खेळतात. झोके बांधतात. तुझ्या पानांच्या सळसळीचे संगीत कानांना किती मधुर वाटतं बघ!” आजोबा पुढे म्हणाले, “अरे मित्रा तुझ्याकडे खूप काही आहे. त्याकडे दुर्लक्ष करून दुःखी होऊ नकोस. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी कधीच मिळत नसतात. जे मिळालं त्यात सुख मानायचं असतं.”

माझ्याकडे बघ! मला तर एक पायच नाही. गाडी, बंगला या गोष्टी तर माझ्यासाठी खूपच दूरच्या. पण मी त्याचं दुःख करत नाही. आनंदात राहतो. जे माझ्यासोबत असतात त्यांना मी आनंद वाटतो. हे ऐकून झाडाला आपली चूक कळली आणि मग ते वाऱ्याच्या तालावर नाचू लागलं, हसू लागलं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -