प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
एकदा ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव टॅक्सीने घरी आले. चक्क एकटेच आले म्हणजे ‘मी येतोय’ असे त्यांनी कळवले होते पण वयाची ऐंशी दशके ओलांडलेले देव, कोणासोबत तरी येतील असे वाटले होते पण ते एकटेच आले. घरात सासू-सासरे होते त्यांच्याशी त्या काळातील काही सिनेमांमधील गाण्यांविषयी गप्पा झाल्या. चहापाणी झाल्यावर त्यांनी मला विचारले, “आत्माराम भेंडे तुमच्या घराच्या आसपास राहतात ना?” मी म्हटले, “हो.” मग म्हणाले, “आपण जाऊया का त्यांना भेटायला?” नाट्यकर्मी आत्माराम भेंडे आमच्या देवनार कोमसपाच्या कार्यक्रमाला एक – दोन वेळा आलेले होते. त्यामुळे त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता. मी त्यांना फोन लावला आणि यशवंत देव आलेले आहेत. त्यांना घेऊन दहा मिनिटांत तुमच्याकडे येते, चालेल का?, असे विचारले. त्यांनी आनंदाने होकार दिला आणि “वाट पाहतोय”, म्हणाले. मग यशवंत देवांना घेऊन मी त्यांच्या घरी गेले आणि गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेस यशवंत देवांचे वय होते साधारण त्र्याऐंशी वर्षे तर आत्माराम भेंडे साधारण अठ्ठ्याऐंशी वर्षे. त्यांचा गप्पांच्या दरम्यान यशवंत देवांनी विचारले, “तुम्ही कोणत्या वर्षी या घरात राहायला आलात?” त्यांनी त्यांना सांभाळणाऱ्या मुलाला समोरच्या टेबलावरची डायरी हातात आणून द्यायला सांगितली. त्या डायरीत बघून त्यांनी कोणत्या वर्षी ते राहायला आले ही माहिती तर दिलीच पण हे घर किती साली घेतले, किती स्क्वेअर फूट आहे वगैरे इतर माहितीही सहजच पुरवली. मग यशवंत देवांनी बोलता बोलता त्यांना कोणत्या तरी पुरस्काराविषयी विचारले, ज्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला भेंडेंसोबत देव उपस्थित होते याची त्यांना आठवण आली होती.
परत त्याच डायरीमध्ये बघून भेंड्यांनी त्यांना माहिती दिली हे पाहून यशवंत देवांनी विचारले, “या डायरीत बऱ्याच नोंदी करून ठेवलेल्या आहेत तुम्ही?” तर ते म्हणाले, “होय अलीकडे काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. हे असे पुढे-मागे होणार हे खूप पूर्वीच माझ्या लक्षात आले होते, तेव्हाच काही नोंदी करून ठेवल्या होत्या. बघा ना आता त्याचा किती चांगला उपयोग होतो आहे!” यावर आम्ही तिघेही खूप हसलो. आमच्या हास्यात त्यांना सांभाळणारा मुलगासुद्धा सामील झाला.
तर अनेक गोष्टींच्या नोंदी आपणही करून ठेवतो; परंतु त्या नोंदीचा आपल्याला उपयोग होतो का? कधी होतो? किंवा नोंदी का, कशासाठी केल्या आहेत याची आपल्याकडून परत नोंद घेतली जाते का? या सगळ्या गोष्टींविषयी मला स्वतःला साशंकता आहेच!
माझ्या कॉलेजमध्ये लतिका नावाची माझी मैत्रीण होती. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्याकडे माझे खूप जाणे-येणे होते. तिची आई खूप छान स्वयंपाक करायची. त्यांच्याकडे गेल्यावर जेवल्याशिवाय सोडायची नाही. खूप गप्पा करायची आणि माझे खूप कौतुक करायची म्हणून मानवी स्वभावानुसार मला ती मनापासून आवडायची. लतिकाचे लग्न झाले आणि ती परदेशी राहायला गेली. अलीकडे आईला बरं नाही म्हणून ती माहेरी परतली होती. मी लतिकाला आणि त्या अानुषंगाने तिच्या आईची ही भेट होईल म्हणून त्यांच्या घरी गेले. माझ्या लक्षात आले की, आईची स्मृती पूर्णतः गेलेली आहे. म्हणजे लतिका जेव्हा मला म्हणाली, “आई, मलाही ओळखत नाही.” तेव्हा मला खूप वाईट वाटले. तिचे बाबा दारापुढून जाताना एखादा शब्द माझ्याशी बोलले पण त्या बाबांच्या आवाजाने तिच्या आई खूप दचकली. नंतरही आमच्याबरोबर चहा घेण्यासाठी बाबा त्या खोलीत आले तेव्हा आईचा चेहरा एकदम आक्रसलेला जाणवला. लतिका मला सोडायला खाली आली तेव्हा ती मला म्हणाली, “आता आईचे काही शेवटचे दिवस राहिले आहेत; परंतु तिच्या मनामध्ये बाबांची भीती आहे कारण जन्मभर ती बाबांच्या दहशतीखालीच वावरायची. बाबा ‘उठ’ म्हटले की उठायची ‘बस’ म्हटले की बसायची. कोणत्याही गोष्टीला ते ओरडायचे तेव्हा ते निमुट ऐकून घ्यायची. या सगळ्या गोष्टीची तिला इतकी सवय झाली की, बाबांच्या नुसत्या आवाजानेही ती थरथर कापायची आणि तू पाहिलंस की आताही जवळजवळ सगळ्याच गोष्टीची तिला विस्मृती झाली आहे तरीसुद्धा बाबांच्या सहज बोलण्याच्या आवाजानेही ती केवढी दचकते, घाबरते.”
त्या क्षणी मला असे वाटून गेले की जरी आपल्याला विस्मृती झाली तरी काही गोष्टींच्या स्मृती, हृदयात खोल दडून राहिलेल्या असतात. त्याबद्दल त्या व्यक्तीला कधी आनंदाचे उमाळे, तर कधी दुःखाचे कढ येऊ शकतात!
अशाच स्मृती गेलेल्या काही माणसांविषयी मी ऐकले आहे. माझ्या कॉलेजमधील माझी एक सहकारी तिच्या आईविषयी बोलत होती. ती म्हणाली की, आई एखादे भांडे गॅसवर ठेवते, गॅस चालू करते आणि ते भांडे पूर्णत: जळले तरी ती त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. दिवसभरातून दहा-पंधरा वेळा चहा करून पिते. म्हणजे आपण चहा प्यायलो आहे, हे तिच्या लक्षात येत नाही. हळूहळू तिची स्मृती कमी होत आहे. त्यानंतर वर्षभराने तिने सांगितले की, आईचे जेवण झाल्यावर दहा मिनिटांत ती परत जेवण मागते. त्यानंतर काही दिवसांतच ती माझ्या मैत्रिणीला ओळखू शकत नव्हती. अशा अनेक मित्र-मैत्रिणींकडून त्यांच्या जवळच्या नातेवाइकांच्या मित्र-मैत्रिणींच्या स्मृती हरवलेल्या माणसांच्या गोष्टी ऐकल्या, काही कथासुद्धा वाचल्या आहेत.
माणसाचे मन खूप विचित्र आहे म्हणजे झालेल्या घटनांबद्दल तर दुःख करतोच; परंतु वर्तमानात चालू असलेल्या घडामोडींविषयीही दुःखी असतो. ज्या घटना भविष्यकाळातही आयुष्यात घडणारच नाहीत, अशांबद्दलही दुःख करत राहतो. उदाहरण म्हणून सांगते, अनेक प्रकारचे आजार असतात; परंतु मला नेहमी वाटते की मला ‘विस्मृती’ हा आजार होऊ नये आणि विस्मृती झाली तर काय, याचा विचार करूनच कधी कधी मी दुःखी होते. तसा कोणताही आजार हा त्रासदायकच असतो म्हणा! पण तरीही शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे वयाच्या नव्वदीतही जशी यशवंत देवांची स्मृती खणखणीत होती, तशी ती राहावी, असे प्रत्येकालाच वाटते, त्याला मीही अपवाद नाही!
pratibha.saraph@ gmail.com