दी लेडी बॉस – अर्चना सोंडे
दी बर्गर कंपनीची संस्थापिका नीलम सिंग कॉलेजमध्ये शिकत असताना तिला जाणवलं की, तरुणांना परवडेल आणि आवडेल असे खाद्यपदार्थ असणारे रेस्टॉरंट खूप कमी आहेत. आपण आपलं रेस्टॉरंट सुरू करायचं असं स्वप्न तिने पहिलं. नोकरी करताना तिने काटकसर करत पैसे साठवले. २० लाख रुपयांत स्वतःचं दी बर्गर कंपनी नावाने एक आऊटलेट सुरू केलं. आज तिच्या दी बर्गर कंपनीचे १०० आऊटलेट आहेत आणि ५८ कोटी रुपयांची उलाढाल आहे. ही लेडी बॉस आहे दी बर्गर कंपनीची संस्थापिका आणि सीईओ नीलम सिंग.
नीलम मूळची आग्रा येथील रहिवासी. तिचे वडील एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते आणि आई गृहिणी होती. नीलम या जोडप्याची एकुलती एक मुलगी. २००८ मध्ये दिल्ली पब्लिक स्कूल, आग्रा येथून तिने १२ वी पूर्ण केली. २०११ मध्ये दयाल बाग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, आग्रा येथून बीबीएची पदवी संपादन केली. पुढे भारतीय चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट्स ऑफ इंडिया (आयसीएफएआय) हैदराबाद येथून मार्केटिंग विषयात एमबीए केले.
आग्रा येथील तिच्या महाविद्यालयीन दिवसांमध्ये, मित्रांसोबत फिरत असताना, नीलमला जाणवले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गरजा भागवणारे रेस्टॉरंट्स क्वचितच आहेत. आपण कुटुंबासमवेत महागड्या रेस्टॉरंट्समध्ये जातो पण जेव्हा मित्रांसोबत बाहेर जातो तेव्हा परवडणारी ठिकाणेच शोधतो जिथे चांगले जेवण आणि वातावरण मिळेल. त्यात आग्रा हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ असूनही खिशाला परवडणाऱ्या रेस्टॉरंट्सची मात्र कमतरता होती. तेव्हाच तिने ठरवले की ‘एक दिवस मी माझे स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करेन. दरम्यान आयसीएफएआयमध्ये नीलमला तीनदिवसीय कॅम्पस फेस्टिव्हलमध्ये या क्षेत्रात तिची कौशल्ये तपासण्याची संधी मिळाली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत या फेस्टिव्हलमध्ये फूड स्टॉल लावला आणि १ लाख रुपयांचा नफा कमावला.
तीन दिवसांच्या त्या फूड स्टॉलने तिला व्यवसाय कसा चालवला जातो याचे जणू प्रशिक्षणच दिले. खाद्य व्यवसायात चांगला नफा असल्याचे तिच्या लक्षात आले. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीलम सिंगने एमबीए करत असतानाच क्यूएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट) उद्योगाकडे लक्ष दिले. एमबीएची विद्यार्थिनी म्हणून, तिने या उद्योगाबद्दल शिकण्यासाठी तीन महिने रेस्टॉरंटमध्ये इंटर्न म्हणून काम केले होते. या इंटर्नशिपमधून नीलमने ब्रँडिंग, मार्केटिंग, स्वयंपाकघरातील कामे आणि इतर कामे यांचे व्यावहारिक ज्ञान मिळवले आणि त्यानंतर सुमारे तीन वर्षे तिने कॉर्पोरेट जगतात काम केले.
जेनपॅक्ट, बंगळूरु येथे ५ लाखांच्या वार्षिक पॅकेजसाठी व्यवसाय विश्लेषक म्हणून सुरुवात करून, ती नंतर दिल्लीतील आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये रुजू झाली. ती २०१४ ते २०१६ च्या मध्यापर्यंत तिने तिथे काम केले. यावेळी ती सहकाऱ्यांसोबत ऑफिसचे जेवण टाळत असे आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठेल्यावर २० रुपयांत जेवण जेवत असे. अशाप्रकारे तिने फक्त आठ महिन्यांत सुमारे ५ लाख रुपये साठवले. २०१६ मध्ये नीलमने नोकरी सोडली आणि बर्गर आऊटलेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. बर्गर तरुणांमध्ये लोकप्रिय होता म्हणून तिने ते निवडले. तिने गुरुग्राममधील मॉलमध्ये २५० चौरस फुटांचे दुकान भाड्याने घेतले. सहा महिन्यांहून अधिक नियोजन आणि चार महिन्यांची तयारी केल्यानंतर शेवटी २०१८ मध्ये तिने पहिले आऊटलेट उघडले आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. तिच्या कंपनीचे नोंदणीकृत नाव ९ प्लेट्स हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. आहे, तर द बर्गर कंपनी (टीबीसी) हा ब्रँड आहे.
या पहिल्या आऊटलेटमध्ये नीलम आणि अन्न तयार करणारी एक मुलगी असे दोनच लोक होते. त्यांनी पाच प्रकारचे बर्गर, फ्राईज, काही एपेटायझर आणि शीतपेयांपासून सुरुवात केली. नीलमने गरज पडली तेव्हा आऊटलेट पुसण्यास किंवा भांडी धुण्यास कधीही मागे-पुढे पाहिले नाही. पहिल्या आऊटलेटसाठी २० लाख रुपये खर्च आला. मात्र मेहनत आणि नियोजन यांच्या जोरावर अवघ्या चार वर्षांत, द बर्गर कंपनीची दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, बिहार, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांमध्ये १००च्या वर आऊटलेटची साखळी निर्माण झाली, तर ५८ कोटी रुपयांची उलाढाल कंपनीने केली आहे.
२०१४ मध्ये, नीलमचे लग्न नितेश धनखरशी झाले. नितेश एमिटी युनिव्हर्सिटीमधून एमबीए आहे आणि त्याने वॉलमार्ट, बिग बाजार आणि डाबरमध्ये काम केले आहे. नितेश आणि नीलम दोघेही लग्नानंतर दिल्लीत स्थायिक झाले. या दाम्पत्यास युवराज नावाचा गोंडस मुलगा देखील आहे. कोविड लॉकडाऊन दरम्यान आऊटलेट बंद होते. लॉकडाऊननंतर जेव्हा ते पुन्हा सुरू केले तेव्हा नीलम फ्रेंचायझी मॉडेलसह तयार होती आणि तिने ऑक्टोबर २०२० मध्ये दिल्लीत आपली पहिली फ्रेंचायझी विकली.
लॉकडाऊननंतर, उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणारे लोक, ज्यांना दुसरे उत्पन्न हवे होते असे लोक फ्रेंचायझी विषयी विचारणा करू लागले. कंपनीने संधी साधली आणि वेगाने विस्तार केला. आज १०० आऊटलेटपैकी फक्त एका कंपनीच्या मालकीची आहे आणि बाकीची फ्रेंचायझी आहेत. सुमारे २० लोक थेट कंपनीसाठी काम करतात, तर सुमारे १,००० जणांना फ्रेंचायझींच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. नितेश देखील २०२१ मध्ये कंपनीत सामील झाला आणि तो मार्केटिंग आणि फायनान्सची पाहू लागला. आज, टीबीसी नाचो, फ्राईज, कूलर, शेक, पिझ्झा, क्रंचो, वॅफल्स आणि पास्ता याशिवाय २५ प्रकारचे बर्गर ऑफर करते. याची किंमत ३९ रुपयांपासून २३९ रुपयांपर्यंत आहे. स्वप्न पाहा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झपाट्याने काम करा. नीलम सिंगच्या उद्योजकीय प्रवासाची हीच शिकवण आहे. खऱ्या अर्थाने शून्यातून विश्व निर्माण करणारी ती लेडी बॉस आहे.