हिवाळा सुरु झाल्याची लागली चाहूल
कुडूस : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असुन रविवारी सकाळीच मात्र वाडावासीयांना धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली पाहावयास मिळाल्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनी या धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. सकाळीच धुके पडू लागल्याने अखेर हिवाळा सुरू झाल्याची चाहूल वाडावासीयांना लागली आहे.
मागील काही दिवसांपासून वाड्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सकाळी व दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस अशा सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेक साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झाल्याचे दिसत आहेत. मात्र असे असताना रविवारी सकाळीच बाहेर पडलेल्या नागरिकांना एक वेगळेच दृश्य पाहावयास मिळाले असून सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली होती.
तालुक्यात पडलेले धुके इतके दाट होते की सकाळीच काaही वेळ विशिष्ट अंतरावरील दृश्य आगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण व जिकिरीचे होऊन बसले होते.
धुके का तयार होते
पाण्याच्या बाष्पाचा एक प्रकार म्हणजे धुके होय. हवा काही ठरावीक प्रमाणामध्ये वायू अवस्थेत किंवा वाफ स्वरूपात जल धारण करू शकते. हवेतील पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास हवा अधिक ओलसर होते. हवेतील पाणी विरघळून ते वायू पासून द्रवरूपात बदलते. या प्रक्रियेमुळेच धुके निर्माण होते.