कोलकाता : जगामध्ये रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमधून (Indian Railway) दररोज कोट्यवधीनी लोक प्रवास करत असतात. भारतामधील रेल्वे हे प्रवासाचं एक स्वस्त आणि सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र काही घटना अशासुद्धा घडत असतात. ज्याच्यामुळे रेल्वे प्रशासनावर नामुष्की ओढावत असते. आता अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कोलकात्यावरून (Kolkata) अमृतसरकडे (Amritsar) जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे.
धक्कादायक बाब अशी की, ही ट्रेन जालंधर स्टेशनपासून सुमारे ३० मिनिटांपर्यंत उलट्या दिशेने धावत राहिली. नकोरडा जंक्शन येथे ३० मिनिटांनंतर पोहोचल्यावर ट्रेन चुकीच्या दिशेला जात असल्याचं ड्रायव्हरला लक्षात आलं. त्यानंतर इंजिन बदलून ट्रेन परत आपल्या मार्गावर आणण्यात आली. या दरम्यान, ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवाशी प्रचंड घाबरून गेले. तसेच सोशल मीडियावरून अनेकांनी या घटनेबाबत सावालही उपस्थित केले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. त्यानंतर वृंदावन रेल्वे स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर पुढे एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे मालगाडीचे काही डबे रुळांवरून उतरले होते. या अपघातात कुठलीही हानी झाल्याचं वृत्त नाही.