पंढरपूर : राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाला अनंत चतुदर्शीनिमित्त (Anant Chaturdashi 2024) निरोप देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जनसाठी डीजे आणि डॉल्बी साऊंडचा दणदणाट करण्यात आला. मात्र, या आनंदावर विरजण पडणारी घटना पंढरपूरमध्ये (Pandharpur) घडली.
पंढरपूर शहरातील डॉल्बी मालक अमोल खुटाले (Amol Khutale) हा शेगाव दुमाला येथे गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड जोडत असताना या तरुणाला अचानक चक्कर आली आणि अमोल जागेवरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना अमोल खुटाले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर पंढरपूर शहरातील सर्वात मोठे मंडळ असणाऱ्या श्रीमंत लोकमान्य मंडळाने आपल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने गणेश विसर्जन मिरवणूक रद्द केली.
पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
तर अहमदनगरमध्येही दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे हे अहमदनगर पोलीस दलात कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी चित्रपटाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर ते आपल्या घरी परतले. घरी गेल्यावर ज्ञानेश्वर मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.