१०-१५ दिवसांत आचारसंहिता लागणार
- जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक
- शिंदे-फडणवीस-पवारांचीही लवकरच बैठक
मुंबई : महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्यापासून सलग ३ दिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावर बैठक होणार आहे. याबाबत उबाठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे, तरीही जागावाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचे आमंत्रण दिले आहे. ते इतके व्यस्त असल्यामुळेच तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवले आहे की, काहीही झाले तरी आजपासून ३ दिवस आम्ही चर्चा करु ,असे त्यांनी म्हटले आहे.
बैठकीत महायुतीमधील जागांचा निर्णय अपेक्षित
पुढील २ दिवसानंतर जागावाटपावर युतीच्या बैठका सुरू होणार आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर येत्या ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील, अशी माहिती शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
तिसऱ्या आघाडीचीही बैठक
राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसऱ्या आघाडीचीही बैठक होणार आहे. आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल. याबाबत उद्या आमची बैठक आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लीम संघटनांशी आमची चर्चा आहे. या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील. त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जावू, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
भाजपाची मोर्चेबांधणीची आघाडी
लोकसभा निवडणूकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा कमालीची सावध झालीआह. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा भाजपाकडून अभ्यास करण्यात आला असून येथील निवडणूकांसाठी परराज्यातील भाजपा नेत्यांचीही नियुक्ती करुन मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. नितीन गडकरींपासून फडणवीस, बावनकुळे व अन्य नेत्यांवरही भाजपाकडून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी व शिवसेना या मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या व आपण किती लागा लढवायच्या, याचीही चाचणी भाजपाकडून पूर्ण झाली असल्याची भाजपाच्या नेत्यांकडून खासगीत सांगण्यात येत आहे.