भोपाळ : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील धवरी धरणात दोन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये उमरिया येथील अरविंद प्रजापती (१९) आणि अजयगड येथील कृष्णा गुप्ता (२०) यांचा समावेश आहे. दोन्ही विद्यार्थी इंदूरच्या महात्मा गांधी मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होते.
रविवारी, १५ सप्टेंबर रोजी, दोघे तरुण धरणाजवळ अंघोळीसाठी गेले होते, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे ते बुडाले. शोधकार्यादरम्यान, त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे पन्ना आणि इंदूरमधील वैद्यकीय विद्यार्थी समुदायातही दुःखाची भावना आहे.
अशा घटनांमध्ये सुरक्षिततेची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असून प्रशासनाकडून अशा धरणांवर अधिक सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.