कोकणी बाणा- सतीश पाटणकर
नेहमीचे प्रसिद्ध गणपती तर सगळ्यांनाच माहिती असतात. त्यातल्या अनेकांचे व्यावसायिकीकरणसुद्धा झालेले आहे. त्यांच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत थांबावे लागते; परंतु हे आडवाटेवरचे गणेश अत्यंत शांत, रमणीय ठिकाणी वसले आहेत. गर्दी, गोंगाट काहीही नाही. देव आणि आपण यांच्यामध्ये कोणीही नाही. कितीही वेळ इथे थांबावे, त्याच्याशी संवाद साधावा, मन शांत करून घ्यावे आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालू लागावे. हे सगळे आडवाटेवरचे गणेश तुमच्यासमोर आणण्याचे प्रयोजन हेच आहे.
नागपूर-वर्धा रस्त्यावर वर्ध्यापासून अंदाजे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक लोक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासूरवधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रा नगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रा गणेश असे म्हणतात. केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेशमंदिर आहे. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे.
भोरगिरी-भीमाशंकर या पदभ्रमण मार्गावरचे सुरुवातीचे गाव आहे. अगदी छोटं टुमदार गाव आहेे. पुण्यापासून जेमतेम ८० किमी अंतरावर हे गाव आहे. इथे भीमेच्या काठावर कोटेश्वर मंदिर आहे. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे. कोटेश्वर मंदिरात गाभाऱ्याच्या बाहेर एक गणपतीचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंची असलेल्या गणेशाची वेशभूषा आकर्षक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला गडहिग्लजच्या पश्चिमेला फक्त ७ कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे. करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते ४ मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे.
पुण्यात गणेशखिंडीमधील पार्वतीनंदन गणपती शिवकाळापूर्वीपासून अस्तित्वात असावे. असे म्हटले जाते की, राजमाता जिजाबाई एका श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या होत्या. त्यावेळी िखंडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न होता. त्यांनी या गजाननाचे दर्शन घेतले. ही पुरातन मूर्ती असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी इथे सुंदर मंदिर बांधले.बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले श्रीघृष्णेश्वर हे सुद्धा वेरूळलाच आहे; परंतु त्याचबरोबर एक सुंदर गणेशस्थानसुद्धा इथे आहे. त्याचे नाव आहे लक्ष विनायक. अर्थातच आडवाटेवरचे असल्यामुळे अनेक मंडळींना त्याची माहिती नसते. हे गणेश स्थान एकवीस गणेशस्थानांपैकी एक आहे. श्रीगणेशाची मूर्ती भव्य असून डाव्या सोंडेची आणि उजवी मांडी वर करून बसलेल्या स्थितीतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यात एक गणेशस्थान आहे एरंडोल. इथली मूर्ती एरंडोल आजरा इथे पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. या मंदिरात अष्टविनायकांच्या प्रतिमा आठ दिशांना ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे. मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश करता येत नाही. मराठवाड्यातील ६७ गणेशस्थानांपैकी एक असलेले स्थान म्हणजे िलबागणेश. प्रत्यक्ष चंद्रदेवतेने स्थापन केलेला गणपती नगर-बीड रस्त्यावरील मांजरसुंभा या गावापासून अवघे ११ कि.मी. वर हे देवस्थान आहे. दोन फूट उंचीची गणेशाची स्वयंभू मूर्ती मंदिरात स्थापन केली आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार इ.स. १९३० मध्ये श्री भवानीदास भुसारी यांनी केल्याचा शिलालेख प्रवेशद्वारावर बसवलेला आहे.
तुरंब्याचे देवस्थान हे याच प्रकारातले एक आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर कोल्हापूरपासून ३५ किमी अंतरावर राधानगरी तालुक्यात तुरंबे नावाचे गाव आहे. मुख्य रस्त्यावरच आता जीर्णोद्धार झालेले सिद्धिविनायकाचे मंदिर लागते. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरातन आहे. या मंदिरात अंदाजे अडीच फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे.
रत्नागिरीच्या दक्षिणेला श्री स्वरूपानंद स्वामींच्या पावस या गावापासून गणेशगुळे अवघे २ किमीवर आहे. गावात आदित्यनाथ, वाडेश्वर, लक्ष्मीनारायण ही मंदिरे तर आहेतच; परंतु इथे असलेले श्री गणेश मंदिर अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते उंच डोंगरावर असून अगदी शहाजीराजांच्या काळापूर्वीही ते अस्तित्वात असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी शिळा असून त्यामुळे ते दार बंद केलेले दिसते. इथे या शिळेलाच गणेश मानून तिची पूजा करतात. त्या शिळेवरच एक गणेशाकृती प्रकट झालेली दिसते. या गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला व तो पुन्हा इथे प्रकट झाला, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
देवगड-दाभोळे-दहिबाव रस्त्यावर दाभोळे गावापासून २ कि.मी.वर हे ठिकाण आहे. रस्त्याच्या बाजूला एक छान गणपती मंदिर बांधलेले दिसते. संगमरवरी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील गणेशाची मूर्ती बघण्याजोगी आहे. चतुर्भुज गणेश एका आसनावर बसला असून त्याच्या पायाशी वाहन उंदिर आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हा पोखरबावचा गणेश पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पण आव्हाणेचा निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. आव्हाणे हे गाव. पूजेतली मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेश उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली.
बुरोंडी या दापोलीपासून फक्त १२ कि.मी.वर असलेल्या गावातली ही गोष्ट आहे. या गावातले नंदकुमार आणि दुर्वास साखरकर हे दोघे त्यांच्या एकवीरा नावाच्या होडीतून मासेमारी करण्यासाठी हर्णजवळ खोल समुद्रात गेले असताना त्यांच्या होडीपाशी काही एक लाकडी वस्तू तरंगताना त्यांना आढळली. सगळ्या ग्रामस्थांनी एकमताने असे ठरवले की, या गणेशमूर्तीला आता आपल्या गावामध्येच स्थापित करायचे. गावात तर मूर्ती ठेवण्याजोगे मंदिर नव्हते, मग शेवटी या मंडळींनी गावातल्याच श्रीसावरदेवाच्या मंदिरात एका भागात माघी गणेश जयंतीच्या दिवशी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून त्या गावाला, साखरकर कुटुंबीयांना भरभराटीचे दिवस आले असे लोक सांगतात. चार फूट उंचीची शिसवीच्या लाकडाची ही मूर्ती तीन तोंडांची आहे. मूर्तीला ६ हात असून पाश-दंत अशी आयुधे तिच्या हातात आहेत. तुंदिलतनू आणि विविध अलंकारांनी मढवलेली ही गणेश मूर्ती अतिशय देखणी आहे.
कणकेश्वर अलिबागपासून दोन हजार फूट उंचीवरील डोंगरावर आहे. हे शंकराचे स्वयंभू स्थान मानले जाते. इथे एक सुडौल, देखणी गणपतीची प्रतिमासुद्धा पाहण्याजोगी आहे. अलिबागपासून फक्त दहा कि.मी.वर मापगाव आहे. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱ्हाड येथील गणेशशास्त्री जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र याने ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके १७९८ रोजी बांधले. या रामचंद्र संन्याशानेच पुढे स्वामी लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त श्री लंबोदरानंद स्वामी यांना भगवान परशुरामाने तपश्चर्यासाठी श्रीलक्ष्मी गणेशाची लहान आणि देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कणकेश्वर इथे जाऊन तपश्चर्या करावयास सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर स्वामींच्या समाधी शेजारीच हे गणेश मंदिर बांधले; परंतु या गणेशाची पूजा करू नये असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील श्री गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदर स्वामींना दिलेली मूर्ती तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे.
शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले, वेदमूर्तींना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता २५ नोव्हेंबर १६६४. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱ्यावर होता का गणपती? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱ्यावर वायरी भूतनाथाच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाईट बनलेला जांभळ्या रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. या मोरयाची साग्रसंगीत पूजा करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरुवात केली.
रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा या ठिकाणापासून जेमतेम ८ कि.मी.वर नंदीग्राम ऊर्फ नांदगाव आहे. या गावी आहे श्रीसिद्धिविनायकाचे देवस्थान. हे एक जागृत आणि नवसाला पावणारे दैवत आहे, अशी याची पंचक्रोशीत प्रसिद्धी आहे. मंदिरातील मूर्ती अंदाजे ४ फूट उंचीची असून ती उजव्या सोंडेची आहे. या गणपतीभोवती प्रदक्षिणा घालताना सर्व बाजूंनी याचे दर्शन घेता येते. नागपूर-िछदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आधासा हे क्षेत्र आहे. एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर असून मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात गणेशाची भव्य अशी दशभुज मूर्ती सिंहावर आरूढ झालेली आहे. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थापना केली. तेच हे अदोष क्षेत्र. या गणेशाच्या २१ स्थानांपैकी हे एक जागृत गणेश स्थान आहे.
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात असलेले कंधार हे गाव याच कंधार गावाच्या पश्चिमेस सुमारे ३ कि.मी. अंतरावर हे गणेश मंदिर आहे. कंधार गावच्या सीमेवर अंदाजे सहा फूट उंचीची ही भव्य गणेशमूर्ती आहे. लंबोदर, महाकाय, गजकर्णक अशी असून ती दुरून शेंदराची रास असल्यासारखे भासते. मूर्तीपूजेसाठी पाच किलो शेंदूर, चार फूट यज्ञोपवीत आणि हार लागतात. कर्जत तालुक्यात पेठचा किल्ला किंवा कोथळीगड प्रसिद्ध आहेच. याच कोथळीगडाच्या परिसरात एक सुंदर गणेशस्थान आहे. कडाव गावचा दिगंबर सिद्धिविनायक. कर्जत रेल्वे स्टेशनपासून जेमतेम आठ कि.मी.वर आहे कडाव. इथली गणेशप्रतिमा खूप प्राचीन आहे, असे संगितले जाते. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी इथली आख्यायिका आहे
पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. गणपती असा स्त्रीरूपात का दाखवला असेल? शिल्पकाराची ही चूक तर नाही ना झाली, असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. पण ही चूक वगैरे काही नाहीये. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्तीरूपात दाखवायची असेल तर ती स्त्रीरूपात दाखवतात. विनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. अलिबागजवळच्या नवघर या खडकाळ बेटावर जलदुर्ग बांधायचा संकल्प शिवरायांनी केला. किल्ल्यावरचे गणेश किंवा किल्ल्याचा दरवाजावर गणेशपट्टी असणे हे काही नवीन नाही, पण या किल्ल्यामध्ये चक्क गणेश पंचायतन आहे. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे आहेत.
सन १७५९ मध्ये राघोजी आंग्रे यांनी ४५ से.मी. उंचीची संगमरवराची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. नांदेडमध्ये एक अल्पपरिचित गणेशस्थान आहे. त्रिकूट गणेश हे त्याचे नाव. नांदेडच्या पूर्वेला अंदाजे ८ कि.मी. अंतरावर गोदावरी आणि आसना या नद्यांचा संगम होतो. या संगमस्थानी गोदावरीच्या पात्रात हे दगडी बांधणीचे मंदिर आहे. हे गणेश मंदिर नागपूरकर राजे रघुजी भोसले यांनी बांधले. साक्षात भगवान शंकरांनी गणेशाला गणाध्यक्षपद मिळविण्यासाठी इथे अनुष्ठान करण्यास सांगितले. त्याप्रमाणे गणेशाने अनुष्ठान केले. त्या तपसिद्धीनंतर शंकरांनी गणेशाला मांडीवर बसवून इथे गणेशतीर्थाची स्थापना केली. त्याचे द्योतक म्हणून येथे शिविलग आणि त्यावर गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. हे गणेशस्थान स्वयंभू आणि सिद्ध असे मानले जाते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत )