विशेष- भालचंद्र ठोंबरे
धार्मिक पुराणानुसार जेव्हा जेव्हा भूतलावर विनाशकारी व अधर्मी व्यक्तीकडून अत्याचार केला जाताे तेव्हा तेव्हा भगवान विष्णू अवतार घेऊन या अधर्मी व्यक्तीचा नाश करून धार्मिक वृतीची वाढ होईल असे वातावरण निर्माण करतात. विष्णूप्रमाणेच श्रीगणेशानेही दुष्टांच्या निप्पातासाठी वेळोवेळी वेगवेगळे अवतार धारण केल्याचा उल्लेख उपपुराण असलेल्या मुद्गल पुराण व गणेश पुराणात आढळतात. मुद्गल पुराणात श्री गणेशाने आठ अवतार घेतल्याचा तर गणेश पुराणानुसार चार अवतार घेतल्याचा उल्लेख आहे.
मुद्गल पुराणानुसारचे अवतार
१.वक्रतुंड-मत्सरासुर नामक दैत्याचा नाश करण्यासाठी गणेशांनी प्रथम जो अवतार धारण केला तो वक्रतुंड रूपात. वक्रतुंड म्हणजेच सोंड वक्र असलेला. मत्सरासुराने शिवाची भक्ती केली. त्याला सुंदरप्रिय व विषयप्रिय नामक दोन मुले होती. या तिघांनी मिळून पृथ्वीवर उच्छाद मांडला तसेच देवांनाही त्रस्त केले. तेव्हा सर्व देवगण शिवाकडे गेले व मत्सरासुराच्या त्रासातून मुक्त करण्याची विनंती केली. शिवाने त्यांना गणेशाची आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे देवांनी आराधना केली असता गणेशानी वक्रतुंड रूपात सिंहावर आरूढ होऊन मत्सुरासुर व त्याच्या दोन्ही मुलांचा वध केला.
२. एकदंत-मदासूर नावाचा दैत्य शिवाची आराधना करून अतिशय प्रबळ झाला. त्याने स्वतः शिवालाही पराभूत केल्याची आख्यायिका आहे. देवांच्या प्रार्थनेनुसार गणेशाने एकदंत रूपात चार हात हत्तीचे, मुख व मोठे पोट असलेल्या रूपात उंदरावर बसून मदासुराचा नायनाट केला.
३. गजानन-आख्यायिकेनुसार एकदा पार्वतीला पाहून कुबेराच्या मनात लोभ जागृत झाला व त्यापासून लोभासुराचा जन्म झाला. त्यानेही शिवाची आराधना केली व आपल्याला कोणापासूनही भय राहू नये अशी मागणी शिवाकडे केली व निर्भय होऊन तो देवांवरही अत्याचार करू लागला. अखेर देवांनी देव गुरू बृहस्पतीकडे धाव घेतली असता देवगुरूंनी गजाननाची आराधना करण्यास सांगितले. गणेशाने हत्तीसारखे मुख असलेल्या या अवतारात उंदरावर बसून लोभासुराचा नायनाट केला. काही ठिकाणी लोभासूर न लढताच गजाननाला शरण आल्याचा उल्लेख आहे.
४. विकटामासुर नावाचा दैत्य शिवाची आराधना करून शक्तिमान झाला व त्याने पूर्ण त्रिलोकाला त्रस्त केले, गणेशाने मोठे विक्राळ रूप घेऊन मोरावर स्वार होऊन कामासुराचा पराभव करून देवांना निर्भय केले.
५. लंबोदर-क्रोधासूर नावाच्या दैत्याने सूर्य देवाची उपासना करून विजयी होण्याचे वरदान मागितले व त्या आधारे पूर्ण त्रिलोकाकडे विजयासाठी प्रस्थान केले. त्यामुळे भयभित झालेल्या देवांनी केलेल्या आवाहनावरून गणेशाने लंबोदर अवतार धारण करून क्रोधासुराला पराजित करून पाताळात पाठवले.
६. विघ्नराज-पार्वतीच्या हास्यातून मयासुर नावाचा एक राक्षस निर्माण झाला. हा तपाचरण करीत असताना शंबरासुराची व त्याची भेट झाली. शंबरा सुराने त्याचा विवाह आपल्या कन्येशी केला व त्याला राक्षसी विद्या शिकविल्या. मयासुराने बहुसंख्य देवतांना कैद केले. तेव्हा त्यांनी सुटकेसाठी श्रीगणेशाची आराधना केली. गणेशाने विघ्नराजाच्या रूपात त्यांची सुटका करून ममासुराला ज्ञानदान केले.
७. धूम्रवर्ण-अहम नावाच्या एका राक्षसाचा जन्म सूर्य देवाच्या शिंकेतून झाल्याची आख्यायिका आहे. त्याने शुक्राचार्यपासून विद्या ग्रहण केली. त्याला आपल्या शक्तीचा अतिशय गर्व झाला. तेव्हा गणेशाने धुरासारखा वर्ण असलेले धूम्रवर्ण रूप घेऊन अहंकासुराचा नाश केला. यावेळी त्यांचे वाहन उंदीर होते.
८. महोदर-गुरू शुक्राचार्यांनी तपोसाधनेद्वारे एका दैत्याची निर्मिती करून त्याला मोहासूर नाव दिले. तेव्हा गणेशाने मोठे पोट असलेला महोदर अवतार घेऊन त्याचा नायनाट केला. गणेश पुराणानुसार सत्ययुग, त्रेतायुग द्वापार युग व कलियुग अशा प्रत्येक युगात एक असे चार अवतार गणेशाने धारण केले. सत्ययुगात महोत्कट, त्रेता युगात मयुरेश्वर, द्वापार युगात गजानन आणि कलियुगात धूम्रकेतू, असे चार अवतार गणेशाने धारण केल्याचा उल्लेख गणेश पुराणत आहे. ही सर्व राक्षस रूपे म्हणजे मानवी शरीरात असलेल्या षडरिपूची प्रतिकात्मक रूपे असल्याचे मानले जाते.