दररोज दहा नवीन रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील (Raigad) अलिबाग,पेण,पनवेलमधील ग्रामीण भागात सध्या डेंग्यूचे (Dengue) रुग्ण सापडत असून,मागील काही दिवसांपासून येथे डेंग्यूने थैमान घातले आहे.डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग कामाला लागले असून, जिल्ह्यात दररोज नवीन दहा रुग्ण सापडत असल्याने ऐन गणेशोत्सवात आरोग्य विभागाची (Health Department) पार झोपच उडाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन,कधी पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रादूर्भावदेखील वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल,अलिबागबरोबरच आता पेण तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कळंबोली,खारघर, नवीन पनवेल,सुकापूर,विचुंबे तसेच पनवेल शहराबरोबरच पेणमधील रावे,अलिबागमधील भाल, साखर या भागात एका दिवसात ३६ रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह पेणमधील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची देखील धावाधाव सुरू झाली आहे. ज्याठिकाणी रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी यंत्रणेद्वारे तपासणी करून परिसरात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. उपाययोजना करूनदेखील शहराबरोबरच आता डेंग्यूने ग्रामीण भागांतदेखील शिरकाव केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
डेंग्यू रोखण्यासाठी काय कराल
घराच्या परिसरात अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. सखल भागात साचलेले पाणी काढून तो भाग कोरडा करावा. खिडक्यांना जाळ्या बसवून घरात डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत, यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.