Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजआले रे आले बाप्पा आले...!

आले रे आले बाप्पा आले…!

जोरदार सरींची बरसात झेलत अखेर ‘आले रे आले बाप्पा आले…’ विघ्न दूर करत सुखाची चाहूल देणारा हा गणेशोत्सव. बाप्पा गणराय प्रत्यक्षात केवळ दहा दिवसांचे पाहुणे असतात, पण यानिमित्ताने एकत्र येणाऱ्यांना वर्षभर पुरेल इतके समाधान मिळते. हा सण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतो. असा हा लहानग्यांच्या नवथर पायांना नाचवणारा, युवावर्गाला तालावर थिरकवणारा आणि प्रौढांच्या जबाबदार खांद्यावर विश्वासाने विसावणारा हा सण आहे.

गणपती विशेष – मंजिरी ढेरे

जोरदार सरींची बरसात झेलून सुखावलेले समस्त जीव आता उत्सवपर्वामध्ये चिंब भिजण्यासाठी सज्ज आहेत. स्वाभाविकच यंदाच्या गणेशोत्सवात वेगळे रंग भरण्याची खात्री आहे. ग्राहकांची वाढती क्रयशक्ती, हौसेला मोल नसल्याचे समोर येणारे सत्य, सर्व प्रकारच्या सामानाने काठोकाठ भरलेला बाजार आणि अनुभवण्याबरोबरच दाखवण्याच्या हव्यासापोटी होणारा खर्च या सगळ्यांमुळेच गणेशोत्सवात रंग भरू लागलाय.

आधीच गणेशोत्सवाचे वातावरण भारलेले… त्यात यंदा पाऊस सर्वदूर चांगली साथ देतोय. राज्यातील सगळी धरणे काठोकाठ भरली आहेत. ही सुजलता भविष्यातील संपन्नतेचा आरसा दाखवणारी… सहाजिकच यंदा हा बिलोली आरसा लखलखीत आणि आकर्षक असल्यामुळे सणउत्सवांचे पर्व आनंददायी होणार यात शंका नाही. एव्हाना घरात प्रतिष्ठापित होणाऱ्या मूर्तीची पूर्वनोंदणी झाली असेल. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळांमधील लगबग वाढल्याचे, तर नाक्यानाक्यावर दिसतेच आहे. कारागिरांकडून मंडपात मूर्ती आणतानाही मोठा लवाजामा बरोबर नेण्याचा हा काळ वेगळेच रंग भरतोय. बाजार तर केव्हापासूनच सज्ज आहे. एकूण काय, तर गणपती आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या लाडक्या गौरींच्या स्वागतासाठी आपण सगळेच झडझडून कामाला लागलो आहोत. कोणाचे रेल्वेचे आरक्षण, कोणाची परदेशातून लँड होण्याची वेळ साधत गुरुजींना बोलावण्याची कसरत, कोणाला मुलाबाळांची हौस भागवत आपल्या मतांशी करावी लागलेली तडजोड, यंदाची सजावट नाविन्यपूर्ण होण्यासाठी घेतले जाणारे थोडे अधिकच कष्ट… गणेशोत्सव असे असंख्य नमुने दाखवतो. ही लगबग, आतुरता, ओढ, भक्तीरसात बुडून जाण्याची सज्जता, थेट हृदयापर्यंत भिडणाऱ्या आरत्यांची आवर्तने, गणेशस्तवने, मोदकांची तयारी… एक ना दोन… ही सगळी तयारी करण्यात हे दिवस कसे सरतात ते समजतही नाही. प्रत्यक्ष उत्सवकाळाबरोबरीने या पूर्वतयारीचा आनंद घेण्याची मजाही काही वेगळीच असते.

अलिकडचा वैश्विक बाजार हा आनंद द्विगुणीत करतो, असेही म्हणता येईल. याचे कारण श्रींच्या स्वागतासाठी, सजावटीसाठी दरवर्षी नवनवीन वस्तू बाजारात येत असतात. सध्या ऑनलाईन पोर्टलपासून गल्लीबोळातील दुकानांपर्यंत सगळीकडेच कोपरा ना कोपरा सजावट आणि पूजासाहित्याच्या सामग्रीने व्यापलेला दिसतो. यातील वैविध्य, आकर्षकता, कलात्मकता, ग्राहकांना वापरास सुकर ठरणारी रचना आणि एकाच कीटमध्ये आवश्यक त्या सगळ्या साहित्यांची उपलब्धता हे फंडे उत्सवातील उत्साह वाढवण्यास कारक ठरतात. आताही बाजार अशा पारंपारिक पद्धतीपासून आधुनिक साहित्यांपर्यंत असंख्य वस्तूंनी उधाणलेला दिसतो आहे. कृत्रिम फुलांच्या माळा, महिरपी, दीपमाळा, समया, तयार रांगोळ्या, वैविध्यपूर्ण चौरंग, मखरे, आरसे, आकर्षक पडदे आदी नानाविध प्रकारच्या सामानाने बाजार सजला आहे. गणपती दीड दिवसांचा असो वा दहा दिवसांचा, तयारीत काही कमतरता राहणार नाही याची जो तो दक्षता घेतोय. श्रींच्या स्वागतासाठी सगळे कसे परिपूर्ण हवे. कारण ही परिपूर्णता बाप्पांपेक्षा आपल्यालाच जास्त समाधान देऊन जाते. आपल्या लाडक्या दैवताच्या स्वागतात कोणतीही कसूर ठेवली नाही, हे समाधान दीर्घकाळ टिकते.

यंदा श्रींच्या मूर्तीमध्ये नानाविध प्रयोग केलेले दिसत आहेत. पर्यावरणविषयक जागृतीमुळे विघटनशील साहित्याच्या आणि नैसर्गिक रंगांच्या वापराने बनवलेल्या मूर्ती गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत आहेत. या साहित्यात शाडू मातीपासून कागदाच्या लगद्यापर्यंतच्या विविध साहित्यांपासून मूर्ती घडवण्याकडे कल वाढतो आहे. थर्मोकॉलऐवजी जाड बोर्ड अथवा कार्डशिटचा वापर करून केलेली मखरे अधिक आकर्षक आणि सुयोग्य वाटतात. सजावट प्रकाशमान करणारे दिव्यांचे, हायलाईट्सचे आणि विजेच्या माळांचे असंख्य प्रकार सध्या उपलब्ध आहेत. त्यातही काचेचे दिवे लक्षवेधी ठरत आहेत. समया, निरांजन, शोभेचे दिवे असे बरेच प्रकार पहायला मिळत आहेत. आरतीचे सजवलेले तबक, मण्यांच्या आकर्षक रांगोळ्या, आरास सोपी करणारे सजावटीचे साचे, घरी येऊन आरास करून देणाऱ्यांचे वाढते प्रमाण हे सगळे सध्याचे वैशिष्ट्य ठरावे. टिकल्या, आरसे, कुंदन अथवा मोत्यांच्या सरींनी सजवलेली तबके आरतीची शान वाढवतील यात शंका नाही.

सजावटीच्या या साहित्यांबरोबर या दिवसांत श्रींच्या दागिन्यांची आणि पूजेच्या उपकरणांची बाजारपेठही गजबजलेली दिसते. अगदी एक ग्रॅम सोन्यापासून घणसर घडणीपर्यंतच्या दागिन्यांपर्यंत वैविध्य पहायला मिळत आहे. श्रींसाठी लखलखता मुकूट, गळ्यातील बहुपदरी हार, कंठी, जानवे, कर्णफुले, सोंड आच्छादित करणारा दागिना, भिकबाळी, गणेशाच्या हातातील सर्व शस्त्र आदी साहित्य मूर्तीचा साजशृंगार करण्याच्या कामी येते. श्रींच्या बैठक व्यवस्थेसाठी मोठा पाट अथवा चौरंगही या सजावट सामानात समाविष्ट होतो. पूजा साहित्यांमध्ये चांदी-सोन्याच्या दूर्वांपासून, पान-सुपारी, सुक्या मेव्यांपर्यंत सर्व सामान उपलब्ध आहे. हे सोनेरी आणि रुपेरी दागिने पूजेला एक आगळेच मांगल्य देऊन जातात. भरजरी वस्त्रे आणली, देखणी आरास केली आणि पूजेची साग्रसंगीत तयारी झाली की कसे निर्धास्त वाटते. गणेशआगमनाच्या प्रतीक्षेत व्यतित होणारा हा काळही अनोखा अनुभव देऊन जातो.

गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरुप हे या सणाचा महोत्सव होण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणावे लागेल. आपल्याकडे बरेच सण घरातल्या घरात साजरे होतात. कुटुंबीयांच्या मर्यादित आणि आखीव-रेखीव वर्तुळात संपन्न होतात. पण घराचा उंबरा ओलांडणाऱ्या या सणांमुळे हे वर्तुळ विस्तारले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा बाल आणि तरुणांसाठी एक कार्यानुभवच असतो. संघटनशक्ती विकसीत करणारा आणि संघटनक्षमतेला चालना देणारा आणि संघटनातील खरी ताकद समोर आणणारा हा सण बाल आणि तरुणांबरोबरच प्रौढांनाही कार्यप्रवण करणारा आहे. आपापल्या झापडबंद कार्यशैलीतून बाहेर पडत वेळ मिळेल तसे या उत्सवाच्या तयारीत योगदान देणारे अनेकजण सध्या आपण पाहत आहोत. समाजात मिसळण्याची, झोकून देऊन काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण प्रापंचिक अडचणींचे अडथळे पार करत असताना ही संधीच मिळत नाही. म्हणूनच अशी संधी देणाऱ्या गणेशोत्सवासारख्या सणाचे महत्त्व जाणवते.

काय मिळत नाही या वातावरणात? इथे कल्पनाशक्तीला वाव मिळतो, कौशल्याच्या सादरीकरणाची संधी मिळते, नवे मित्र-मैत्रिणी गवसतात, ते आपल्या ग्रुपशीही जोडले जातात. एकत्र काम केल्यामुळे सुसंवादाला चालना मिळते. सगळे एका पातळीवर येऊन काम करत असल्यामुळे दरी दूर होण्यास मदत होते. काही वेळा या निमित्ताने समाजभान जागृत होते. एक प्रकारे या अनौपचारिक वातावरणात मैत्री फुलते, दोस्ती घट्ट होते, कधी- कधी याच दिवसांत दोन जीव एकमेकांना भेटतात आणि आयुष्याचे जोडीदार बनतात. ताज्या संदर्भानिशी बोलायचे, तर सध्याच्या रिल्सच्या जमान्यात अनेकांना आपली कल्पनाशक्ती दाखवत चर्चेत राहण्याचा, वेगवेगळे प्रयोग करून लाईक्स वाढवण्याचा एक चांगला मंचही मिळतो. सजगतेने पाहिले, तर सध्या सोशल मीडिया याच बातम्यांनी, रिल्सने, कॉमेंट्स आणि क्लिप्सने भरलेला दिसतोय. म्हणजेच गणराय प्रत्यक्षात केवळ दहा दिवसांचे पाहुणे असतात, पण या निमित्ताने एकत्र येणाऱ्यांना वर्षभर पुरेल इतके समाधान मिळते. हा सण त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतो. असा हा लहानग्यांच्या नवथर पायांना नाचवणारा, युवावर्गाला तालावर थिरकवणारा आणि प्रौढांच्या जबाबदार खांद्यावर विश्वासाने विसावणारा हा सण आहे. दोन्ही वेळची पूजा, आरती आणि प्रसाद या उपचारांची धुरा सांभाळणारे वृद्धही आपल्या क्षमतेनुसार यात सहभागी होतात. एकंदरीत, संपूर्ण समाज या महोत्सवात विरघळून जातो, रममाण होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -