मुंबई: ऑलिम्पिक खेळाडू रेबेका चेप्टेगीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एका रिपोर्टनुसार रेबेकावर तिच्या बॉयफ्रेंडने अतिशय निघृणपणे हल्ला केला. ही युगांडाची धावपटू आहे. रेबेका या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. युंगाडाच्या ऑलिम्पिक समितीने याबाबत माहिती दिली आहे. रेबेका एंडेबेसमध्ये राहत होते. तेथे ती ट्रेनिंगही करत होती.
द गार्जियनच्या रिपोर्टनुसार रेबेकाच्या बॉयफ्रेडने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवले.यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रेबेकाचा यात दुर्देवी मृत्यू झाला होता. ही घटना केनियामध्ये रविवारी घडली. रेबेकाच्या शरीराचा साधारण ७५ टक्के भाग जळाला होता.
जमिनीवरून सुरू होता वाद
रेबेकाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भाग घेतला होता. ती ४४व्या स्थानावर राहिली होती. रेबेकाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव डिक्सन नदीमा असे आहे. तोही आगीमुळे जखमी झाला आहे. रिपोर्टनुसार रेबेका आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या घटनेनंतर रेबेकाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या वडिलांनी याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. रेबेकाच्या मृत्यूप्रकरणी युगांडाच्या अॅथलेटिक्स महासंघाने दु:ख व्यक्त केले आहे.