Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीअरेरे! तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

अरेरे! तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडिलांची १५ किमी पायपीट!

गडचिरोली : तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाल्याने गडचिरोलीत खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता. ही शोकांतिका येथेच थांबत नाही. यानंतर वेळेवर शववाहीका उपलब्ध न झाल्याने अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले.

अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची बुधवारी चित्रफित सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होत आहे. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचे आजोळ आहे.

दोन दिवसांपूर्वी आई-वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. ४ सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई-वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले. तेथे त्यांना जडीबुटी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली.

त्यामुळे त्यांना रुग्णालयात हवण्यात आले. परंतु बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले. जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई-वडिलांवर नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. दोन्ही भावंडांच्या मृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला. मात्र, भाबड्या आशेपोटी दोन्ही मुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगठ्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली, पण दोन्ही चिमुकले गमावलेल्या वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन जड पावलांनी पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहन जाणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली.

“दोन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागविण्यात येईल.” – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -