Friday, April 10, 2026

कपासे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा मनमानी कारभार!

कपासे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा मनमानी कारभार!

जेष्ठ नागरिकाच्या घराजवळील स्ट्रीट लाईट काढून ठेवले अंधारात…

नवीन पाटील

सफाळे : सध्या सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम असून पालघर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते सोबतच स्ट्रीट लाईट दुरुस्ती आणि बदलीची कामे सुरू असतानाच, सफाळे पश्चिमेकडील कपासे ग्रामपंचायतीच्या मग्रूर सरपंच आणि शिपायाने शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी गावातील जेष्ठ नागरिकाच्या घराजवळील स्ट्रीट लाईट काढून मागील सहा दिवसांपासून त्यांना नाहक अंधारात ठेवून त्रास देण्याचा विचित्र प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

कपासे ग्रामपंचायत हद्दीत नरेश पांडुरंग पाटील या जेष्ठ नागरिकाचे राहते घर असून मागील ७० वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत. रेल्वेलगत एकांतात राहणाऱ्या नरेश पाटील यांच्याकडे मागच्या काही वर्षात तीन वेळा घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान सफाळे पोलिसांच्या सूचनेवरून पाटील यांनी महावितरण विभाग तसेच त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घराजवळ सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट लावून घेतल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी विरार - डहाणू चौपदरीकरणाच्या प्रकल्पात पाटील यांच्या घरासमोरील रहदारीच्या रस्त्यावर असणारे भलेमोठे वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीअपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि पाटील यांच्या घराजवळ उजेड राहावा या दृष्टीने त्यावरील स्ट्रीट लाईट त्यांच्या घराच्या पडवीजवळ बसवून दिली. सोबतच कपासे फाटक ते पाटील यांच्या घराजवळील लाइटचे पोल देखील रेल्वेच्या प्रकल्पासाठी महावितरणकडून हटविण्यात आल्याने त्यातील एक पोल देखील त्यांच्या घराजवळ उभारून त्यावर देखील स्ट्रीट लाईट बसविण्यात आली होती.

दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी नरेश पाटील कामानिनिमित बाहेर जात असताना कपासे ग्रामपंचायतीचा मग्रूर सरपंच प्रकाश कोंब आणि शिपाई विकास दोघे त्यांच्या घरी जाऊन स्ट्रीट लाईट काढण्यासाठी आलो आहे असे म्हणाले, पाटील यांनी तुम्ही इतक्या वर्षांपासून असणारी स्ट्रीट लाईट कशी काढू शकता असा जाब विचारला असता दोघेही आवाज चढवून बोलत होते. त्यानंतर पाटील यांनी स्ट्रीट लाईट काढू नका मी महत्त्वाच्या कामानिमित बाहेर जातोय असे म्हणून निघाले. त्यानंतर नरेश पाटील यांच्या पत्नी यांनी देखील स्ट्रीट लाईट काढू नका असे वारंवार सांगूनही चढ्या आवाजात दादागिरी करून सरपंच आणि शिपाई या दोघांनी पडवीमधील आणि महावितरणच्या पोलवरील दोन्ही स्ट्रीट लाइट वायरसकट काढून चालते होऊ लागले.

त्यावेळी नरेश पाटील यांच्या पत्नी नीलम पाटील यांनी आम्हाला असे अंधारात ठेवू नका, उद्या काही अनर्थ घडल्यास तुम्ही जबाबदार राहाल असे सांगताच, शिपाई विकास याने रागारागात ठिकठिकाणी जॉईंट असलेली धोकादायक वायर नारळाच्या झाडाला बांधून त्यावर एक बल्प लावून निघून गेले.

त्यानंतर नरेश पाटील यांनी सरपंचाकडे योग्यप्रकारे स्ट्रीट लाईट लावून देण्याची मागणी करूनही त्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन सणासुदीत जेष्ठ नागरिकांना आणि रस्त्याने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थाना रात्री जीव धोक्यात घालून चाचपडत राहण्याची वेळ ओढवली आहे.

यासंदर्भात, कपासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शिला पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, सार्वजनिक गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने मी सरपंच आणि शिपाई यांना गावात जिथे जिथे स्ट्रीट लाईट बंद असेल किंवा वायर खराब असेल तेथील दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी असा प्रकार केला असेल तर ते चुकीच असून त्यांच्याकडे मी विचारणा करते असे सांगितले.

Comments
Add Comment