पालघर : एसटी बसमधील प्रवाशांचे वाद नवे नाहीत, मात्र पालघरमधील सफाळे बस आगारात चक्क एक एसटी चालकच प्रवाशाशी भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशासोबत झालेल्या वादाचे पर्यवसान इतक्या टोकाच्या संतापात झाले की, संतापलेल्या चालकाने अंगावरील खाकी युनिफॉर्म काढून थेट आगारातच त्या प्रवाशाविरोधात दंड थोपटले. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पाहता-पाहता विकोपाला गेला. यावेळी रागाच्या भरात असलेल्या चालकाने आपल्या पदाची आणि गणवेशाची पर्वा न करता प्रवाशाला भिडण्याचे आव्हान दिले. हा सर्व राडा सुरू असताना बस स्थानकावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, 'लाल परी'च्या चालकाच्या या वर्तणुकीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
View this post on Instagram
बसला उशीर झाल्याने प्रवाशांनी विचारणा केली असता, चालक अश्वजीत कांबळे याने चक्क आपला युनिफॉर्म उतरवून बाजूला ठेवला आणि भर आगारात प्रवाशाच्या अंगावर धावून जात दंड थोपटले. "खाली उतर, तुला बघतोच," असे म्हणत त्याने प्रवाशाला धमकावले. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे, त्याच चालकाचा हा उद्दामपणा पाहून उपस्थित बघेही अवाक झाले. या संपूर्ण राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, नेटिझन्सकडून या 'उर्मट' चालकावर कडक कारवाईची मागणी होत आहे. एसटी महामंडळाच्या शिस्तीला हरताळ फासणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अश्वजीत कांबळे या चालकाला रोखण्यासाठी त्याचे सहकारी ही पुढे सरसावले होते. पण ते त्यांचे ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. व्हिडीओमध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहे. एकाने रोखलं तर दुसरा त्यांना रोखत होता. पण त्यांना ही ढकलून कांबळे पुढे जात असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणती ही तक्रार दाखल झालेली नाही. किंवा कांबळे यांच्यावर ही कोणत्या कारवाईचे संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र या व्हिडीओची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.






