Thursday, March 27, 2025
Homeगणेशोत्सवGanesh Chaturthi 2024 : यंदा पहिल्यांदा घरी गणपती बाप्पा बसवणार आहात? मग...

Ganesh Chaturthi 2024 : यंदा पहिल्यांदा घरी गणपती बाप्पा बसवणार आहात? मग ‘या’ चुका करु नका; आणि ‘हे’ आवर्जून करा

चातुर्मासामधील श्रावण महिन्याची सांगता होऊन भाद्रपद महिना सुरु झाला आहे. वर्षभरातील उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अनन्य साधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. गणपती डेकोरेशनपासून, पार्थिव गणपती पूजनापर्यंत सर्वच साहित्यांनी बाजार गजबजून गेले आहे. यंदा शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ रोजी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे.

केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशासह जगभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळते. अनेकांकडे परंपरेने घरात एक गणपतीची मूर्ती आणली जाते आणि ती पुजली जाते. परंतु, एकत्रित कुटुंबात न राहणाऱ्यांना आपल्याही घरी गणपती आणावा, त्याची मनोभावे पूजा करावी, बाप्पाची कृपा लाभावी, अशी अनेक जणांची इच्छा असते. आता अनेकदा वडिलोपार्जित घरात आता कुणी राहत नसेल किंवा जुने घर मोडकळीस आलं असेल, अशा विविध कारणांसाठी घरी पहिल्यांदा गणपती आणला जातो. गावी जायला जमत नाही, तिथे पाहणारे कुणी नसतं, अशा कारणांसाठीही राहत्या घरी गणपती आणला जातो. गणपतीचं स्थान बदलण्याची वैयक्तिक कारणे असू शकतात. परंतु, पहिल्यांदा कोणत्याही कारणास्तव गणपती घरात बसवणार असाल, तर काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक असत, असे सांगितले जाते.

संकल्प बोलून दाखवावा

तुमच्या जुन्या घरातून नवीन घरात किंवा गावच्या घरातून राहत असणाऱ्या घरात गणपती आणला जाणार असेल, तर देवापुढे उभे राहून जुन्या वास्तूत नवीन ठिकाणी गणपती आणण्याबाबत एक संकल्प बोलून दाखवावा, असं सांगितलं जाते. कारण अनेक वर्षे परंपरेने तिथे गणपती पूजला जात असतो. त्यामुळे देवासमोर एक संकल्प बोलून दाखवावा, असे म्हंटल जातं. तसेच काही जण उत्साहात पहिल्यांदा गणपती आणतात. तर काही जण अपत्यप्राप्ती झाल्यामुळेही गणपती आणण्याचा संकल्प करतात. अशा वेळेस जे काही मनातील संकल्प आहेत, ते पार्थिव गणपती पूजन करताना बोलून दाखवावेत आणि संकल्प सिद्धीसाठी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना करावी, असे सांगितले जाते.

गणपती बाप्पाची मूर्ती आणताना काळजी घ्यावी

पहिल्यांदा गणपती घरी आणणार असाल तर गणपतीच्या मूर्तीबाबत काळजी घ्यावी. गणपतीच्या मूर्तीची उंची कायम राहील, अशा दृष्टीने विचार करावा. कारण दरवर्षी वेगवेगळ्या उंचीची मूर्ती आणणे योग्य मानले जात नाही. त्यात सातत्य कायम ठेवायला हवे असे सांगितले जाते. गणपती उजव्या सोडेंचा कडक सोवळ्याचा आणि डाव्या सोडेंचा सौम्य अशी समजूत करुन घेणं चुकीचे आहे. गणपतीच्या मूर्तीची सोंड शक्यतो डाव्या बाजूला असावी. अशा मुर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते. याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना असावा तर दुसऱ्या हातात मोदक असलेला असावा.

गणेशाची स्थापना करण्याची योग्य दिशा

गणपतीची मूर्ती स्थापन करताना गणपतीबसवणार ती दिशा योग्य आहे ना, याची पहिली काळजी घ्यावी. तसेच प्रथमच गणपती आणणाऱ्यांनी किती दिवसाचा गणपती असणार हेही निश्चित करून घ्यायला हवं आणि हाच नित्यनेम कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती त्याची उत्तरपूजा करून देव्हाऱ्यांतून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे, असं नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा तुमच्या स्वतंत्र टँकमध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते. गणपतीची मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने मूर्ती ही शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.

शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करावे

प्रथमच गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती पूजन करावे. आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो गणपती पुढे बोलून दाखवावा. गणपतीच्या आवडत्या वस्तू, नैवेद्य अर्पण करावे. आप्तेष्टांना बोलावून आरत्या करून जागर करावा. आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी, असं सांगितलं जातं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -