मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानात धुमाकूळ घालत आहे. संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज लिटन दासने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले आणि असा रेकॉर्ड केला की जो क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात कधीच झाला नव्हता.
खरंतर, बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना जिंकून बांगलादेशने आधीच १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानला चांगलीच टक्कर मिळत आहे.
सामन्यात टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने २७४ धावा केल्या होत्या. यानंतर बांग्लादेश संघाची सुरूवात खूप खराब झाली. पाहुण्या संघाने २६ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. मुश्फिकुर रहीम(३), शाकिब अल हसन(२), झाकीर हसन(१), कर्णधार नजमुल हुसैन शांतो(४), मोमिनुल हक(१) आणि शादमान इस्लाम(१०) पूर्ण फ्लॉप झाले.
कृष्ण भक्त लिटन दासचा धमाका
यानंतर बांगलादेशी हिंदू क्रिकेटर लिटन दास ७व्या स्थानावर आला आणि दमदार खेळी केली. त्याने मेहदी हसन मिराजसोबत मिळून १६५ धावांची भागीदारी केली आणि संघाला सांभाळले. स्वत:ला श्रीकृष्णाचा दास सांगणाऱ्या लिटनने सामन्यात २२८ बॉलमध्ये १३८ धावांची खेळी केली.
१४७ वर्षांच्या इतिहासात घडले पहिल्यांदा
लिटन दासने या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे. तो पहिला फलंदाज ठरला आहे ज्याने संघाची धावसंख्या ५० पेक्षा कमी असतानाही बॅटिंगमध्ये टॉप ५मध्ये येऊन ३ वेळा शतक ठोकले आहेत. १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात त्याच्याशिवाय कोणालाच हे जमलेले नाही.
फार कमी चाहत्यांना माहीत असेल की लिटन दास कृष्ण भक्त आहे. तो स्वत:ला कृष्णाचा सेवक म्हणतो. हेच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायकोमध्येही लिहिले आहे.