पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या येत्या मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवारी सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे परिसरातील शाळा बंद राहणार आहेत. तसेच सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खासगी अवकाश उड्डाणांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर रोजी पहाटेपासून रात्री बारा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन अशा खासगी अवकाश उड्डाणांना बंदी असणार आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.