मुंबई : सध्या देशभरात गणेशोत्सवाचे वातावरण आहे. बाप्पाचे आगमन झाले असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस बसतात. परंतु दहा दिवस हा सण साजरा करण्यामागच कारण तुम्हाला माहितीये का? आज आम्ही तुम्हाला यामागचे कारण सांगणार आहोत.
गणेश चतुर्थी हा गणेशोत्सवातील पहिला दिवस. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणूनदेखील ओळखले जातं. हा दहा दिवसांचा सण गणपती बाप्पाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. ६४ कला आणि बुद्धीचा देवता मानणाऱ्या गणेशाच्या जन्माची एक गोष्ट आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत गणपती बाप्पा गणेश भक्तांना आशिर्वाद देण्यासाठी पृथ्वीला भेट देतात. या वर्षी हा कालावधी ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपतीच्या जन्मामागे एक पौराणिक कथा आहे. पार्वतीने स्नान करताना निघालेल्या मळापासून गणेशाची निर्मिती केली. तिने गणपतीला प्राण दिले. एके दिवशी पार्वती माता स्नान करत असताना गणेशाला बाहेर रक्षण करण्याची आज्ञा देण्यात आली. यावेळी भगवान शिव परतले आणि गणेशाने त्यांना आत जाण्यास नकार दिला. यावेळी भगवान शंकराचा राग अनावर झाला अन् त्यांनी गणेशाचा शिरच्छेद केला. त्यानंतर गणेशाला हत्तीचे डोके लावण्यात आले. त्यानंतर गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान गणेशाची प्रतिकात्मक प्रतिकृती साकारली जाते. गणेश जन्माचा हा कालावधी १० दिवस चालतो.
गणेशोत्सवाला फार मोठी पार्श्वभूमी आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटीश सत्तेच्या कालवधीत हा सण सुरू करण्यात आला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी हा सण साजरा करण्यास सुरवात केली. महाराष्ट्रात बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथम सुरूवात केली. एकूण दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.