मालवण : ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. एक ठाकरे, एक आमदार, एक विरोधी पक्ष नेता, एक माजी खासदार असून सुद्धा हतबल झाले. अडीच तास लपून बसावं लागले. उबाठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकावे लागले. हा ट्रेलर होता, अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता,आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही, अशा शब्दात भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे गटाचा समाचार घेतला.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी भुमिका मांडली. उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट किती घाबरट हे काल आपण बघितले. त्यांचा बंदोबस्त जागेवरच करावा लागतो. जशास तसे उत्तर दिले तर ते पाय लावून पळतात. कधीतरी समोरच्याला त्याची जागा दाखवावीच लागते, असेही निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले.
किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. याचे राजकारण करण्यासाठी आलेल्या ठाकरे गटाला लपून बसण्याची नामुष्की ओढवली हे जनतेने पाहिले. काहीतरी करायचे, समोरच्यांना उसकवायचे आणि पडद्यामागून डाव साधण्याचा प्रयत्न करायचा हे ठाकरे गटाचे खेळ उघडे पडले, असेच या निमित्ताने म्हणावे लागेल.