कोल्हापूर : होमगार्ड नोंदणी कार्यक्रम २०२४ करीता ऑनलाईन प्रणालीमधुन अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी करीता दि. २८, २९ व ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत पुरुष व महिला उमेदवारांना पोलीस कवायत मैदान, कोल्हापूर येथे नियोजीत वेळेत कागदपत्र पडताळणी, शारिरीक व मैदानी चाचणीकरीता बोलविण्यात आले होते. परंतु जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असल्याने उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणुन वरील कालावधीत होणारी कागदपत्र पडताळणी, शारिरीक व मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे.
पुढील तारखा https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या वेबसाईडवर प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी केले आहे.