नवी मुंबई : काही दिवसांपूर्वीच म्हाडाने मुंबईत २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर घेणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आता नवी मुंबईतही (Navi Mumbai) घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. सिडकोकडून ९०२ घरांसाठी सोडत केली (CIDCO Lottery) जाणार आहे. सिडकोची ही घरे कळंबोली, खारघर आणि घणसोली या भागात असून उमेदवार आजपासून अर्ज करू शकणार आहेत.
सिडकोची ही घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण २१३ घरे आहेत. यापैकी १७५ सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर ३८ घरे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील ६८९ घरांपैकी १२८ घरे मध्यम उत्पन्न गटासाठी आणि ४२ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय ३५९ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बामणडोंगरी परिसरात १०० दुकानांची सोडत
सिडकोने घरांसह बामणडोंगरी स्थानक परिसरातील गृहसंकुलातील १०० दुकानांच्या विक्रीसाठी देखील योजना जाहीर केली आहे. यासाठी येत्या ३० ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. दरम्यान, उलवे नोडमध्ये सिडकोने अत्यंत उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर या दुकानांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नजीक असल्यामुळे या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त होणार आहे.