रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे राजापूर ते कोल्हापूर मार्गावरची वाहतूक बंद पडली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी आणि कर्मचारी तातडीने घाटात पाठविले असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राजापूर आणि परिसरातून कोल्हापूरकडे जाणारा हा सर्वात जवळचा घाटस्ता आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक त्याच घाटातून सुरू असते. अणुस्कुरा घाटातील निसर्गसौंदर्यही अप्रतिम असल्याने अनेक पर्यटक याच मार्गाने प्रवास करतात. दरड कोसळल्याने सध्या वाहतूक बंद पडली आहे. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटाच्या दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत.