जलपूजनाला गेले आणि पूजा करत असतानाच अचानक…
पुणे : मागच्या काही दिवसांत पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने अनेक धबधब्यांच्या तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटनासाठी बंदी घातली होती. मात्र, आता पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणच्या वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमातील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत (Indrayani river) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जलपूजनासाठी गेले असता हा अनर्थ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे जवळपास ५०-६० विद्यार्थी आज सकाळी इंद्रायणी नदी पात्रात जलपूजनासाठी गेले होते. यावेळी पूजा करत असताना एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडू लागला, त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी मारली, त्या दरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले आहेत.
याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने जय दायमा (वय १९) या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे तर ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार ह्या दोन विद्यार्थ्यांचा अजूनही युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. आश्रम शाळेच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
आश्रमशाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान, या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे.