…तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही; रामदास कदमांवर रविंद्र चव्हाणांचा प्रहार!
मुंबई : प्रभू रामचंद्रांचा वनवास १४ वर्षांनी संपला; पण मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa highway) १४ वर्षांत झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु मंत्री चव्हाण यांनी आम्ही युतीधर्म पाळतो याचा अर्थ असा नाही की कोणी काही बोलेल. तोंड सांभाळून बोलायचे नाही तर तोंड फोडल्या शिवाय राहणार नाही, असे म्हणत रामदास कदमांवर जोरदार प्रहार केला. गेल्या ४० वर्षांच्या काळात रामदास कदम आमदार, मंत्री म्हणून कोकणचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या काळात विकास कामे सोडाच, पण इतर विकास कामांचे कोणते दिवे लावले ते पहिले स्पष्ट करावे, असे आव्हान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे दिले.
मंत्री चव्हाण यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम डोंबिवलीतील सावरकर उद्यानातील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना लक्ष्य केले.
रामदास कदम हा अडाणी माणूस आहे. मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa highway) हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील विषय आहे. कोकणचा सुपुत्र म्हणून आपण या रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्यात लक्ष घालून हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पंधरा वर्षे मंत्री होते. तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. तेव्हा काय उपटले.. त्यांच्या मुलाच्या दापोली-मंडणगड-खेड या मतदारसंघात रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुती मधल्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. याबद्दल कदम पिता-पुत्रांनी आपले कौतुक करायला हवे. त्यांनी माझे आभार मानले पाहिजे. ते राहिले बाजूला, उलट मलाच लक्ष्य करण्याचा रामदास कदम यांचा प्रयत्न असेल तर जशास तसे उत्तर देण्यास रवींद्र चव्हाण समर्थ आहे.
मलाही बोलायला खूप काही येते. भाजपा म्हणून आपण अतिशय संयम, सौजन्याची भूमिका घेऊन विकास कामे, लोकांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. रामदास कदम विकास कामांच्या विषयावरून लक्ष्य करत असतील तर सौजन्याचा मार्ग बाजूला ठेऊन आपण जशास तसे उत्तर देण्यास आणि प्रसंगी वाईट वागण्यासही तयार आहोत, असा खरमरीत इशारा मंत्री चव्हाण यांनी कदम यांना दिला.
बोलायला मला सुद्धा येते. कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येते ते त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही. हे लक्षात ठेवा, हा रवी चव्हाण आहे. मात्र युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही कोणीही काही बोलेल आणि आम्ही ऐकून घे होणार नाही, हे लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे खरमरीत उत्तर चव्हाण यांनी दिले.
दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवले आहे. तुमचा सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचे काम करतोय. दापोलीत जी भाजपा आहे ती आमच्या मुळावर कशी उठलीय ते मी दिल्लीला कळवले आहे. १४ वर्षानंतर प्रभू रामाचा वनवास संपला परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास संपला नाही. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार आहे. आम्ही काय पाप केलंय, रवींद्र चव्हाण हे चमकोगिरी करतात. काम करत नाही. खड्डेमय रस्ते आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी, रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोकणात युतीमध्ये कुठेही अडचण नाही. दापोलीतील भाजपा मंडळी राक्षसी हेतूने काम करतायेत. आमदार योगेश कदम यांना बदनाम करण्याचे काम करतायेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. हे थांबवा, आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलोय पण आमचा विश्वासघात होतोय असेही रामदास कदमांनी म्हटले.