गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुल्ला या गावात एका वैतागलेल्या बापाने दारूच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हंसराज नारायण मुनेश्वर हा ३२ वर्षीय तरुण दारुच्या आहारी गेला होता. त्याच्या रोजच्या कटकटीला वैतागून त्याची पत्नी माहेरी सालई येथे गेली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हंसराजला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी मुल्ला येथे पोहोचला. घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले. भांडण एवढे विकोपाला गेले की वडिल आणि मुलामध्ये मारहाण झाली. बाप-लेकाच्या या हाणामारीत वडिलांनी मुलाच्या डोक्यावर दगड घातला. या मारहाणीत मुलाचा अंगणात तडफडून मृत्यू झाला.
याची माहिती गावकऱ्यांनी देवरी पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.