इंदापूर: आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात आजपासून इंदापूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी तेथील उपस्थितांना त्यांनी संबोधित केले तसेच विरोधकांवरही जोरदार टीकाही केली.
इंदापूरमधील विरश्री मालोजीराजे भोसले गढी भोवती असणारे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
य़ावेळी नितेश राणे यांनी मंचावर आपले विचार मांडले. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, मी माझे विचार मांडण्यासाठी येथे आलेलो आहे. मी जो आज इथे आलेलो आहे तो मी कोणत्या पक्षाचा आमदार म्हणून नाही कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. तर एक हिंदू म्हणून बोलण्यासाठी आणि तुम्हाला ताकद देण्यासाठी आलेलो आहे.
जेव्हापासून मोर्चा आयोजित आला तेव्हापासून पत्रकार मित्र बातम्या द्यायला लागलेत की नितेश राणेंच्या या मोर्चाला विरोध होणार. नितेश राणेंना इंदापूरमध्ये येऊ देणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या येत आहे.आज या प्रकारच्या बातम्या आल्या नसत्या तर आता जी अफाट गर्दी झाली आहे ती गर्दी जमली नसती. त्यासाठी मी पत्रकार मित्रांचे आभार मानतो.
मी काय येथे स्वत:साठी आलेलो नाहीये. इथे वातावरण खराब करायचे असा आमचा प्रयत्न नाही. आम्ही येथे कशासाठी आलो आहोत विरश्री मालोजीराजे भोसले यांची भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आम्ही जेव्हा नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. त्यांच्या पायावर डोके ठेवल्याशिवाय आमचे पाऊल पुढे जात नाही. त्या छत्रपती शिवरायांच्या घराण्याच्या इथे अपमान होत असेल, अतिक्रमण होत असताना आम्ही या गोष्टीला विरोध केला नाही तर आम्हाला शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा अधिकार नाही. आम्ही येथे कोणतेही राजकारण करायला आलेलो नाही.
जर स्वराज्याचा इतिहास पुसून टाकण्याची कोणी हिंमत करत असेल आणि महाराजांचे मावळे म्हणून आम्ही त्याला उत्तर देत नसू तर भगव्याला हाती घेण्याचा अधिकार आम्हाला आहे का हा प्रश्न तुम्ही एकमेकांना विचारायला हवा.
माझ्या जन्म-मृत्यू पत्रिकेवर आमदार म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून लिहिलेले आहे. त्या नावासाठी मी येथे आलेलो आहे. हिंदूमुसलमान हे एकमेकांचे विरोधी नाही तर हिंदूच हिंदूचे शत्रू आहेत. म्हणूनच आजचा दिवस पाहिला जात आहे. आपलेच आपल्याला विरोध करत आहेत. आपले आपल्याच सभा उधळायला बघताहेत. इथे कोणत्याही पक्षाचे नाव नाही आहे. इथे सगळीकडे भगवा दिसतोय तुम्ही नितेश राणेंना विरोध करत नाही आहात तर तुम्ही भगव्याला विरोध करत आहात.
मराठा आंदोलकांचा विरोध
इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चाला मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला. त्यांनी राणेंच्या या यात्रेला विरोध करत घोषणाबाजी केली. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी यावेळी आंदोलकांना ताब्यात घेतलं.