मुंबई : महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत सरकारने दिली होती. मात्र आता ती मुदत आणखी वाढवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास १ कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. तर अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु अद्याप ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे,असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
अर्ज कसा करावा?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. नवीन वेबसाईटमुळे महिलांना गाव, वॉर्ड आणी तालुक्याची निवड करणे आता सोपे होणार आहे.