रायगडमधील रानभाज्या महोत्सवात मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य
रायगड : रानभाज्या म्हणजे माणसांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. रायगड येथील रानभाज्या महोत्सवात मंत्री आदिती तटकरे यांनी हे वक्तव्य केलं.
पावसाळ्यात शेतामध्ये अथवा जंगलात, डोंगर-रानावर उगवणाऱ्या विविध भाज्या, वनस्पती या आरोग्यासाठी पौष्टिक असतात. त्यामुळे या भाज्यांचा आहारात समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, यासाठी कृषी विभाग, आत्मा आणि विवेकानंद रिसर्च ट्रैनिंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वरसे ग्रामपंचायत सभागृह येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या प्रदर्शनात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले व विक्रीसाठीही रानभाज्या उपलब्ध होत्या.