नेमकं काय घडलं?
नागपूर : राज ठाकरे यांच्या मनसेने काही महिन्यांपूर्वी टोलचा मुद्दा उचलून धरला होता. याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. टोल कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मुद्दा शांत झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मनसैनिकांनी टोलनाक्यावरुन नागपुरात राडा केला आहे. शहराच्या तीस किलोमीटरच्या परिसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर १० किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, मालवाहतूक करणार्या वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ खट्याक स्टाईलने आंदोलन केले. टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ५ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळे, लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मूळ अवतारात आल्याचं पाहायला मिळत आहे. अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. त्यानंतर, ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या कारवर नारळ आणि शेण फेकल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रत्त्युत्तराची पाठराखण करत, जसाश तसे उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे.