नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड
त्या या जगातून गेल्या? आता कधी दिसणार नाहीत? खरेच वाटत नाही. माझी आई गेली तेव्हाही मी अशीच हवालदील झाले होते. “विजूताई, मला तुम्ही खूप आवडता, पण तुमच्यापेक्षा सुद्धा मला बाबा आवडतात,” असे माझ्या ‘ह्याच्या’विषयीचे निर्मळ प्रेम!
माझी विश्वकोशाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा जाहीर पाठिंबा देणाऱ्या स्नेहलताबाईच होत्या. “त्या हे कार्य नक्की पुढे नेतील नि पूर्णत्वास नेतील” हा विश्वास बाईंनीच दाखवला होता; नि वेळोवेळी मला प्रत्येक कामास हजेरी लावून तो खरा केला होता.
इयत्ता ९वीत गणित, इंग्रजीत नापास होणाऱ्या गरीब मुली त्यांच्याकडे मोफत शिकायला येत, हे किती जणांना ठाऊक आहे? संस्कृत, गणित, इंग्रजी, मराठी साऱ्यांवर बाईंचे प्रभुत्व होते.
माझा कुठलाही कार्यक्रम असो. त्या येत, ‘पैसा’ हे प्रलोभन कुठेही नव्हते. स्वखर्चाने येत-जात. “विजूताई, त्यातल्या दोन गरीब मुलींची मी फी भरेन. त्यांच्या पाटी दप्तराचा खर्च करेन.” त्या कुठेही वाच्यता करीत नसत. आपले काम बिनबोभाट करणे त्यांना सहज जमे.
मला त्यांचे विशेष कौतुक वाटे, कारण त्यांच्या मनात मोहास थारा नव्हता. राज्यपालांच्या हस्ते ‘पाटी दप्तर’ प्रदान करायच्या प्रसंगी बाई येत. त्यांचे विशेष स्वागत होई. पण हे त्यांचे स्वागत त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा परिपाक असे.
शामराव त्यांचे पती. बाईंचे त्यांच्यावर श्रद्धायुक्त प्रेम होते. गणपती बाप्पाच्या सजावटीत शामरावांचा फोटो हारीने पुढे लावलेला असे. बाईंना गर्व नव्हता. त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. डीडीवर मुलाखत होती. मी आनंदात होते. बाईही आनंदात होत्या. तेव्हा त्या सायन हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता होत्या. आपला अधिभार तीन तासांकरिता दुसऱ्या डॉक्टरला देताना म्हणाल्या, “मी येईतो जबाबदारी सांभाळा बरं.” आणि इमर्जन्सी आली तर काय करू? बाई, सांगा ना!”
“इमर्जन्सी आली तर जबाबदारीने, विश्वासाने, कणखरपणे निर्णय घ्या. मला खात्री आहे, या बाबतीत तुम्ही चुकणार नाही. मी सुयोग्य व्यक्तीची निवड केलीय हे तुम्हीही जाणता.” डॉक्टर खूश झाले. “विजूताई, डॉक्टरही माणूसच आहे नं.”
“आपण छान प्रोत्साहन दिलंत.”
“अगं प्रोत्साहन हेच तर उत्तम टॉनिक आहे.”
“किती खरं आहे बाई!” मी १०० टक्के पटवून म्हणाले.
दूरदर्शनची मुलाखत उत्तम झाली. संचालकांनी चहा देऊ केला.
घरी येताना बाईंना वाटेत सोडले. मी घरी आले.
“बाईंनी माझी आठवण काढली का गं?” यांनी विचारलं.
“दहा वेळा काढली.”
“काय सांगतेस?”
“खरंच!” मी खरं खरं सांगितलं. “मला बाबा आवडतात.”
हे त्यांचे निर्मळ शब्द मी कधी
विसरणार नाही.
बाईंना सर्जन व्हायचे होते. त्यांची तशी उत्कट इच्छा होती. टाटामध्ये सर्जरीसाठी मुलाखत झाली. “मी टॉपर आहे. मला माझ्या आवडीची शाखा आग्रहपूर्वक मिळायलाच हवी.”
“हे बघा डॉक्टरीण बाई, तुम्हाला संधी मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे. पण पुरुष ‘आपले अवयव’ लेडी सर्जनला दाखवत नाहीत, हा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. अहो, हार्निया नि टायड्रोसिल सारख्या शस्त्रक्रिया तुम्ही कशा करणार? पुरुष कुचराई करतील. मेल सर्जन हवा म्हणतील.” हेड म्हणाले.
“मग मी बालरोगतज्ज्ञ होते.” त्या ठामपणे म्हणाल्या. “हां! हे उत्तम.” हेड सर (डॉक्टर) उत्तर पटून म्हणाले.
पुढे बाई एकदा मला म्हणाल्या, “मी सर्जरी केलेला माझा पेशंट आठ वर्षांचा होता. पण त्याच्या आईचा दृढ विश्वास माझ्यामुळे तिचा बाळ वाचला. दरवर्षी वाढदिवसाला मला हौसेने फोन करते.”
“आता तो केवढा आहे?”
“आता २५ वर्षांचा आहे.” बाई सहजपणे म्हणाल्या. मला खूप म्हणजे खूपच कौतुक वाटले. सर्टिफिकेटवर आईचेही नाव असावे, इतकी वर्षं कुणाला सुचले होते का हो? पण मनात आलेला विचार स्वच्छ शुद्ध होता. पुरुषी अहंकाराच्या दुनियेत तो डावलला गेला, पण बाई पुन्हा पुन्हा तो मांडीत राहिल्या. बिल्किस लतीफ त्यावेळी राज्यपाल होते. कालांतराने त्यांच्या पत्नीने तो आग्रहपूर्वक ‘पास’ केला. असे व्यक्तिमत्त्व काठ पदराची साडी नेसून, हातात बांगड्या, कपाळावर ठसठशीत कुंकू धारण करून समर्थपणे ‘खुर्चीत’ बसल्या. बाई, का गेलात हो? कुठे शोधू तुम्हाला? मी फार व्याकुळ आहे हो !