Sunday, March 16, 2025

ऋतू हिरवा

श्रावणाचे आगमन म्हणजेच सृष्टी सृजन सोहळ्याचा प्रारंभ क्षण. कळत-नकळत आपणही श्रावणाचे होतो. ‘मनसरगम’ सरगम करणारा हा हिरवा ऋतू अनुभवण्याकरिता सप्तरंगात ढळणारा घननीळा श्रावण हा हवाचं!

प्रासंगिक – पूजा काळे

काळानुरूप येणारा श्रावण मास म्हणजे निसर्गाने पेरलेल्या जिवंतपणाच्या खुणाच. या खुणा आपल्या आसपास जेव्हा गंध घेऊन वावरतात ना, तेव्हा जुन्या जाणत्या कवींपासून ते नव्या सारस्वतांपर्यंत सगळ्यांच्या लेखणीला बहार आणतात. शब्दरूपी पाऊस लेखणीतून कोऱ्या कागदावर बरसतो. आषाढ सरतो न् सरतो तोच नवचैतन्य रिमझिम लहरी धारांसवे जमिनीकडे धाव घेतात. कोकीळ तान घुमू लागते, वीज चौघडा वाजवित येते. पाऊस सरींनी आसमंत भिजल्यावर श्रावण धून ऐकू येते. या मनमोर श्रावणाचे आगमन म्हणजे सृष्टी सृजन सोहळ्याचा प्रारंभ क्षण.

मेघ सावळा मुरारी बरसला घननीळा,
नंदगोपाल श्रीहरी श्रावणात लडिवाळा।
आजी आईच्या सुबोध गोष्टीतून उमटलेल्या बाळ श्रावणाची कितीतरी रूपे सांगता येतील. श्रावण मासाची खरी पकड बाल्यावस्थेपासून सुरू होते. छोट्या गोष्टीतून बाळावर संस्कार होतात आणि मोठ्यांनाही अभिव्यक्त व्हावेसे वाटते ते कथा, पोथ्यांमधून. पांडवप्रताप सारख्या धार्मिक ग्रंथातून श्रावण मुखोद्गत होऊ लागतो. पाझरतो मानवाच्या अंतर्मनात, निसर्गाच्या अखंड साखळीत अविरतपणे. वासंतिक मोहरानंतर आषाढी स्वागताला येतात, घनघोर डोळ्यांत न मावणारे काळकभिन्न कृष्णमेघ, वेगे येणारा अल्लड वारा, विद्युलतेचे मनमोहक लटक रूप, बिजांकुर वाढण्याची क्रिया सारं दिमतीला येत, मेघ असे बरसतात की,

डोंगरावरी कोवळ्या रानी
आनंदाचं गाणे गातो.
पीक हसवतो फुलं बहरतो.
अधिरलेल्या मातीमध्ये
मुरता मुरता थोडा उरतो.
हे मुरता मुरता थोडे होणे, म्हणजे रिते होण्याच्या प्रक्रियेपासून सुरू झालेला श्रावण आणि त्यातून सरसर होणारा मोतीमणीसम वर्षाव. वर्षाव… थेंबाचा, वर्षाव… ऋतूचा, वर्षाव… सणांचा, वर्षाव सुप्तावस्थेत दबलेल्या मनरूपी पाखराला कवेत घेण्याचा. त्याच्या स्वागताचा आनंद साजरे करतो आपण.
थोड्याफार फरकाने तिची, त्याची अवस्था ही अशी असते.

निळशार निळपाणी श्रावण झुला.
सृजनाच्या वाटेवरती शोधते मी तुला.
हे शोधणे म्हणजे प्रेमाची परिभाषा. माझ्याकडून तुझ्याकडचा हा प्रवास चिरंतन असतो. नायिकेच्या गाण्यातल्या ओळी आपल्या कधी होतात कळत नाही. आपण गुणगुणतो.
श्रावणात घननीळा बरसला. रिमझिम रेशीम धारा.
हे बरसणे म्हणजे प्रेमाने प्रेमाला जिंकणे होय. जिंकण्यासाठी आलेला हा भावुक श्रावण. सुखाच्या व्याख्येतला डोळ्यांना, स्पर्शाला, मनाला अनुभूती देणारा. ती अनुभूती प्राप्त झाली की, कशाचीच उणीव जाणवू न देणारा असा हा मर्मभेदी प्रवासयात्री श्रावण. समयचित्त राखत निसर्ग जुनी कात टाकतो. तांबड्या मातीत राबणारी सर्जाराजाची भिल्लार जोडी. लावणी नंतरची तरारलेली रोपे. हिरवा गर्द शालू परिधान केलेली वसुंधरा. ऊन, पावसाच्या खेळात विहंगणारे पक्षी, झाडातून उगवणारी, वेलीतून डोकावणारी तर्हेतर्हेची रंगीत फुले. कमनीय बांध्यात सप्तरंग उधळणारे इंद्रधनू म्हणजे साक्षात निसर्गकार देवदत्ताने फिरवलेला जादुई हातच. निसर्गाच्या विविध छटांनी सजलेली वसुंधरा, नववधूला लाजवेल अशा अाविर्भावात अधिराज्य गाजवते मनावर. भर पावसात हुंदडण्याचा मोह अनावर होतो आपल्याला. कळत-नकळत आपणही श्रावणाचे होतो.

स्वर्गरूपी धरेतला हा अनुभव, प्रेमिकांचे मिलन, मुलांचा जल्लोष, पूजाअर्चा, आहार-विहार, स्वयंपाक घरातले चमचमीत गरमागरम पदार्थ, कांदाभजी, साजूक तुपातले लाडू, पातोळ्या, तेलपोळ्या, कडबोळ्या, गोडसं, खाण्यापिण्याची चंगळ, माहेरवाशिणीची लगबग या साऱ्यांचे मनोविश्व श्रावण ओळखतो. सरीवर सरीतून पडणाऱ्या निलधारा जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन या दुर्गाबाईच्या कवितेतल्या ओळींची आठवण करून देतात. चैतन्यमयी पाऊस बरसत असतो प्रत्येकाच्या तनमनात, संस्कारात. तेव्हा एका मागोमाग भावनिक घड्या सुटू लागतात या पावसात. आपण चिंबचिंब भिजतो. मुरवतो आतल्या आत पावसाला. तो आपलाच भाग असल्यासारखा. आपले मोहक रूप, मनाच्या नाजूक अवस्था चितारत असतो श्रावण त्याच्या पटावर आहिस्ता आहिस्ता आभाळाच्या गाभाऱ्यात.

गाती टिपूर तारका.
मित्र चंद्र झुलवितो
दृष्ट लावती मेनका.
ही अवस्था सगळ्यांची होते. भावनेच्या सुक्ष्मातीसूक्ष्म संवेदनेला श्रावण जाणतो म्हणूनचं प्रत्येकाला तो आपला वाटतो. कारण आपल्यातचं असतो तो. प्रसंगी नयनातून पाझरणारा. वेदनेवर हलकीशी फुंकर घालून आपल्याला मोकळे करणारा. वर्षामागे एकदा तरी मोकळे होणे त्याला अन् आपल्याला हवे असते. यासाठी तो प्रकटतो सावळ्या वर्गात कृष्णरूपात. कधी शंकराची अमर्याद शक्ती घेऊन येतो. तर कधी भावाबहिणीचे गुलाबी नाते सांधत येतो. नात्याची हिरवी वीण त्यालाही सोडवत नाही.

हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम करा रे. जीवनाचे गीत गा रे.
‘मनसरगम’ सरगम करणारा हा हिरवा ऋतू अनुभवण्याकरिता सप्तरंगात ढळणारा घननिळा श्रावण हा हवाचं! अशा या लडिवाळ ऋतूचे येणे सुखकारक असते. आपल्या बोथट जाणिवा नामशेष करण्यासाठी त्याच्या मंगलमय सुखाची पखरणं आयुष्याला सोनरूपी वर्ख प्रदान करणारी ठरते. संकटांना पुरे पडण्यासाठी आणि जीवनाचे रथचक्र चालण्यासाठी या ऋतूंची निर्मिती झाली असावी, हे या मागचे कारण असावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -