प्रहार    

Vijay Kadam : मराठी इंडस्ट्री गाजवणारे कोण होते विजय कदम; जाणून घेऊ त्यांचा अल्पपरिचय

  357

Vijay Kadam : मराठी इंडस्ट्री गाजवणारे कोण होते विजय कदम; जाणून घेऊ त्यांचा अल्पपरिचय
ज्येष्ठ अभिनेते #विजय_कदम यांचे आज (१० ऑगस्ट २०२४) रोजी निधन झाले.

मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम. ‘रथचक्र’, ‘टुरटूर’ यांसारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी १९८०च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. विजय दत्ताराम कदम हे त्यांचे पूर्ण नाव. यांचा जन्म ४ जून रोजी झाला.


शरद तळवलकर,राजा गोसावींसारखे ज्येष्ठ विनोदी नट त्यांचे आदर्श होते.विजय कदम यांनी लहान असताना ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असत.कलावंत म्हणून विजय कदम यांची जडणघडण झाली ती डॉ.शिरोडकर हायस्कूल मध्ये. या शाळेतील तळाशिलकर, सावंत महाजन आणि परब सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्या वेळी विजय कदम यांना मिळाले.विजय कदम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून घेतले. ‘तत्वज्ञान’ हा गंभीर विषय घेऊन ते पदवीधर झाले. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा काम करतांना व्यावसायिक दिग्दर्शकांच्या समवेत काम करण्याची संधी तर लाभली.


महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून निवड झाली होती.त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते डेव्हीड यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले होते.विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला.रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली. विजय कदम गेली काही वर्षं सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा' चे प्रयोग करत असत. या लोकनाट्याचे १९८६ पासून विजय कदम यांनी ७५० हून जास्त प्रयोग केले होते.


स्वकल्पनेतून साकारलेला ‘खुमखुमी’ हा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोग होता. ते अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेतर्फे ‘खुमखुमी’ हा मनोरंजनाचा अडीच तासाचा कार्यक्रम सादर करत.या खुमखुमी च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना व गरजू अपंगाना मदत केली होती.


राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके,रेवती,देखणी बायको नाम्याची,मेनका उर्वशी,कोकणस्थ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली होती.सही रे सही,टुरटूर,पप्पा सांगा कुणाचे,विछ्या माझी पुरी करा, खुमखुमी ही देखील त्यांची गाजलेली नाटके.विजय कदम यांनी पार्टनर,गोटया, दामिनी,सोंगाडया बाज्या,इंद्रधनुष्य घडलयं बिघडलयं,ती परत आलीय अशा अनेक मराठी मालिका व श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दिक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अभिनय केला होता. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातीत अभिनय केला होता.विजय कदम यांच्या पत्नी ‘पद्मश्री जोशी’ या पण अभिनेत्री आहेत. ‘पद्मश्री कदम’ या पल्लवी जोशी आणि मास्टर अलंकार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. विजय कदम यांच्या नाटकात काम करताना पद्मश्री यांच्याशी ओळख झाली. ‘नणंद भावजय’ या चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली आहे. ‘चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजले होते. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा हे पद्मश्री यांचे इतर चित्रपट. विजय कदम यांचा मुलगा गंधार कदम हा एक गायक आहे.त्याने पोश्टर बॉईज आणि चित्रपटामधील गाणी गायली आहेत. विजय कदम व त्यांच्या पत्नी पद्मश्री यांची ‘विजयश्री नाट्यसंस्था’असून, गेले अनेक वर्षे त्या माध्यमातून ते अनेक नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे,तर देशभरासह कतार,दोहा,दुबई,सिंगापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे करत असत.विजय कदम यांनी २५ हून जास्त नाट्य संमेलनात हजेरी आणि कार्यकर्ता या नात्याने सहभाग घेतला होता. २०२१ मध्ये विजय कदम हे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. झी मराठीवरील ती परत आलीये या मालिकेत विजय कदम यांनी मालिकेच्या छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली होती.


दोन वर्षा पूर्वी विजय कदम यांनी १ मे या महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनाचं औचित्य साधून youtube वर ‘कदमखोल’ ही नवीन मालिका सुरू केली होती. विजय कदम यांनी 'हलकं फुलकं' या नावाने पुस्तक लिहिले होते.विजय कदम हे गेले दीड वर्षे कर्करोगाने आजारी होते.विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती.


विजय कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments
Add Comment

सोनू निगमच्या आवाजातले 'बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

Marathi Movie Song Released: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी

त्या फक्त अमिताभजींच्या पत्नी आहेत म्हणून... कंगना रणौतने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा

वडील आणि मुलामधील नात्याचं एक अजब रसायन मांडणारे 'दशावतार'मधील 'आवशीचो घो' गाणं प्रदर्शित

Movie Song Release: टीजर आणि पोस्टरमुळे प्रदर्शनापूर्वीच सर्वत्र चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय

अरण्य' चित्रपटात उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी, लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई : एस एस स्टुडिओ निर्मित 'अरण्य' या आगामी मराठी चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे

Kaun Banega Crorepati 17: तुम्हाला बदलायचे आहे का तुमचे नशीब? तर जाणून घ्या कधी पासून सुरू होत आहे KBC

मुंबई: प्रसिद्ध क्विझ शो कौन बनेगा करोडपती आपल्या नव्या हंगामासह परतत आहे आणि सोबतच अनेक

अभिनेता सुयश टिळकच्या गाडीचा अपघात ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुयशने