Thursday, March 27, 2025
HomeविदेशMuhammad Yunus : बांगलादेशमध्ये आज स्थापन होणार अंतरिम सरकार

Muhammad Yunus : बांगलादेशमध्ये आज स्थापन होणार अंतरिम सरकार

मुहम्मद युनूस करणार सरकारचे नेतृत्व

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये (Bangladesh) सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. शेख हसीना यांनी सध्या भारतात तात्पुरता आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. या सरकारच्या प्रमुखपदी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली आहे.

बांगलादेशच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार गुरुवारी स्थापन होणार आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा शपथविधी आज रात्री ८ वाजताच्या दरम्यान पार पडणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी दिली.

दरम्यान, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये १५ सदस्य असू शकतात, असे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी म्हटले आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार असून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला आंदोलकांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत शांतता राखण्याचे आणि सर्व प्रकारची हिंसा आणि हानी टाळण्याचे मी सर्वांना आवाहन करतो.

खलिदा झिया या नजरकैदेतून मुक्त

दरम्यान, शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर बांगलादेशी लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. पाठोपाठ बांगलादेशच्या माजी पंतप्रधान व शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी खलिदा झिया या नजरकैदेतून मुक्त झाल्या आहेत. बांगलादेशचे अध्यक्ष शाहबुद्दीन अहमद यांनी मंगळवारी (६ ऑगस्ट) माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या सुटकेची घोषणा केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्या नजरकैदेत होत्या. नजरकैदेतून मुक्त झाल्यानंतर त्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, खिलाफत मजलिसचे सरचिटणीस मौलाना मामुनुल हक यांनी रुग्णालयात जाऊन खलिदा झिया यांची भेट घेतली. या भेटीवेळी खलिदा झिया म्हणाल्या, आपल्या देशाची संसाधने नष्ट होत आहेत. आपल्याला आपला देश घडवायचा आहे. जे घडतेय ते देशासाठी चांगले नाही. देशात चालू असलेली जीवित व वित्तहानी थांबायला हवी. देशाच्या संपत्तीचे, संसाधनांचे नुकसान होणे गंभीर आहे. आपल्या संसाधनांची लूट चालू आहे. ते थांबायला हवे, असे खलिदा झिया म्हणाल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -