Monday, June 1, 2026

Georgia Helicopter Crash : लग्नानंतर काही मिनिटांतच काळाचा घाला! हेलिकॉप्टर अपघातात भारतीय वंशाच्या नवरदेवाचा मृत्यू; वधूच्या डोळ्यांसमोरच घेतला अखेरचा श्वास

Georgia Helicopter Crash : लग्नानंतर काही मिनिटांतच काळाचा घाला! हेलिकॉप्टर अपघातात भारतीय वंशाच्या नवरदेवाचा मृत्यू; वधूच्या डोळ्यांसमोरच घेतला अखेरचा श्वास

जॉर्जिया : आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने पाहणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर लग्नानंतर अवघ्या काही मिनिटांत दुःखाचा डोंगर कोसळला. अमेरिकेतील (America) जॉर्जिया (Georgia) राज्यात नवदाम्पत्याला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने भारतीय वंशाच्या तरुणाचा मृत्यू (Death) झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटलाही जीव गमवावा लागला. मृत तरुणाची ओळख डेव्ह फिजी अशी असून तो अटलांटा येथे राहत होता आणि डेल्टा एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी जेसनी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

थाटामाटात लग्न, काही क्षणांत आनंदाचे दुःखात रूपांतर

शुक्रवारी डॉसन काउंटीतील डॉसनव्हिल परिसरात हा अपघात (Accident) झाला. डेव्ह आणि जेसनी यांनी अपघाताच्या काही तासांपूर्वीच ‘द रिव्हियर’ या प्रसिद्ध विवाहस्थळी विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. या विवाह सोहळ्यासाठी शेकडो पाहुणे उपस्थित होते आणि कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, लग्नानंतर नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने पीचट्री-डेकाल्ब विमानतळाकडे रवाना होत असताना नियतीने वेगळेच काही ठरवले होते. अटलांटातील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचा त्यांचा बेत होता. परंतु प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरचा (Helicopter) भीषण अपघात झाला.

केरळशी जोडलेली दोन्ही कुटुंबांची मुळे

डेव्ह फिजीचे आई-वडील जॉर्ज आणि फीबा फिजी हे मूळचे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवट्टुपुझा येथील रहिवासी आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले होते. तर जेसनीच्या कुटुंबाची मुळेही केरळमधील अलप्पुझा जिल्ह्याशी जोडलेली आहेत.

खराब हवामानामुळे वाढला धोका

कुटुंबियांच्या माहितीनुसार, विवाह सोहळा रात्री सुमारे साडेनऊ वाजता संपला. त्यावेळी परिसरात दाट धुके आणि पावसामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली होती. व्यावसायिक वैमानिक असलेल्या डेव्हला अशा परिस्थितीत उड्डाण करणे सुरक्षित वाटत नव्हते.

पायलटचा निर्णय ठरला जीवघेणा

उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डॉसनव्हिलच्या नैऋत्येकडील डोंगराळ आणि दाट जंगल असलेल्या दुर्गम भागात कोसळले. अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरचा पूर्ण चक्काचूर झाला. बचाव पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत जेसनी जवळपास पाच तास ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. अपघाताचे ठिकाण दुर्गम असल्याने मदतकार्याला (Rescue Operation) मोठा विलंब झाला.

वधूच्या समोरच नवरदेवाचा मृत्यू

अपघातानंतर शुद्धीवर आल्यावर जेसनीने जे दृश्य पाहिले ते अत्यंत हृदयद्रावक होते. शुद्धीवर आल्यानंतर ती स्वतः ढिगाऱ्याखाली अडकली होती. डेव्ह तिच्या छातीवर पडलेला होता. ती स्वतः व्यवसायाने नर्स असल्याने तिने त्याची प्रकृती तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्याचे शरीर पूर्णपणे थंड पडले होते. जेसनीच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापती झाल्या असून तिला गंभीर मार लागला आहे. सुदैवाने तिचे कोणतेही हाड मोडले नाही. मात्र, नवऱ्याचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहिल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेली . या दुर्दैवी घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायासह केरळमधील दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून, लग्नाच्या आनंदाचे वातावरण क्षणार्धात दुःखात बदलले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >