शाहूवाडी : विशाळगडावर अतिक्रमण आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पाच गुन्हे नोंदवण्यात आले होते, तर २४ जणांना अटक करण्यात आली होती. यातील १७ जणांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर सात जणांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.
विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला १४ जुलै रोजी हिंसक वळण लागले होते. गजापूर ते विशाळगड या पाच किलोमीटर परिसरात दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती. घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी हल्लाबोल केला होता.
विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण लागल्याने त्याचा फटका गजापुरातील मुस्लिम वसाहतीस बसला होता. रस्त्यालगत असणाऱ्या या वसाहतीत आंदोलकांनी दहशत माजवून चारचाकी, टू-व्हीलर तसेच घरांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. अज्ञात आंदोलकांकडून जाळपोळ, घरांचे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी २४ जणांना अटक केली होती. यातील १७ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.