Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPrakash Ambedkar : मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस!

Prakash Ambedkar : मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस!

प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका न पटणारी : प्रकाश आंबेडकर

अकोला : राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha OBC reservation) मुद्द्यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देखील जुंपत असल्याचे चित्र आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरक्षणावरुन महाराष्ट्राचं मणिपूर करण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी हातभार लावू नये, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीदेखील आता शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “मनोज जरांगे (Manoj Jarange) हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

ओबीसी-मराठा आरक्षणाच्या लढाईत सुरु असलेली प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या लाखपुरी गावात ही यात्रा पोहोचली आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे (Manoj Jarange) हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल.

पुढे ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि राजकीय नेते आहेत. मात्र, ओबीसींचं आरक्षण वाचवायला कुणीच तयार नसल्यानं त्यासाठी आपण पुढाकार घेतला. मी ही यात्रा काढली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. आता वातावरण निवळलंय, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंची भूमिका मला पटलेली नाही

प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवरही जोरदार टीका केली. आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीसंदर्भात म्हणजेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात घेतलेली भूमिका मी दुर्दैवी मानतो. उद्धव ठाकरे हे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. आपली भूमिका स्पष्ट करण्याऐवजी ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. त्यांनी आरक्षण वाढवलं तर मराठा समाजाला न्याय मिळेल. ही ठाकरेंची भूमिका मला पटलेली नाही.

राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे

शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता, त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “अशा लोकांवर टाडा लागला पाहिजे. त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे, ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे, मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे. त्याचं काय करायचं? समाज दुभंगण्याची ही वक्तव्यं आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. सरकारने हिम्मत दाखवावी असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -