सिमला : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानुसार हिमाचल प्रदेशच्या कुलू, मंडी आणि सिमला येथे ढगफुटी झाल्याने आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. तेव्हापासून आजपर्यंत ५३ नागरिक बेपत्ता आहेत. बचावपथकाला सहा मृतदेह सापडले आहेत. पुरात साठपेक्षा अधिक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे.
सिमला जिल्ह्यातील समेज भाग, रामपूर, कुलूतील बाघीपूल, मंडीचे पद्दार येथे ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. रामपूर येथे दुरुस्तीचे काम सुरु आहे. पावसामुळे समेज आणि रामपूर भागाला जोडणाऱ्या रस्त्याची हानी झाली आहे. मंडीत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर कुलूत एकाचा मृत्यू झाला आहे.
पावसाने बागीपूल येथील बांधकामस्थितीत असलेल्या कुरपान खाड पाणीपुरवठा योजनेची मोठी हानी झाली असून या योजनेसाठी ३१५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देऊन त्याची माहिती घेतली. हिमाचलमध्ये सध्या लष्कर, पोलिस, एनडीआरएफ यांच्यासह विविध पथकांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू या भागात सुमारे ५० जण मृत्युमुखी पडल्याची भीती राज्याचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतर मृतांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाईल, असे त्यांनी नमूद केले.