पुन्हा एकदा भूस्खलनाची भीती
पुणे : मुंबईत पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरी राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे थैमान सुरु आहे. त्यातच माळीण गावातही धो-धो पाऊस बरसत आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी माळीण गावात (Malin Gaon) दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. यंदाच्या वर्षीही माळीणप्रमाणेच त्या लगतच्या पसारवाडीत भूस्खलनाची भीती व्यक्त केली जाती आहे. या भीतीमुळे गावकऱ्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या आहेत.
माळीणलगतच्या पसारवाडी गावातील डोंगराला भेग पडली आहे. डोंगराची माती हळूहळू वाहत आहे आणि डोंगराची कडा सैल होत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच प्रचंड पाऊस कोसळत आहे. या डोंगराच्या वर पाच-सहा कुटुंब राहत आहेत. हे रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र ते होत नसल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दहा वर्षांपूर्वी गाडलं गेलं होतं माळीण गाव
३० जुलै २०१४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी दरड कोसळून अख्खंच्या अख्खं माळीण गाव मातीखाली गाडलं गेलं होतं. त्यावेळी या गावाची लोकसंख्या साधारण ७५० च्या आसपास असावी. यात ४४ हून अधिक घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एसटी चालकामुळे ही घटना सर्वांना समजली.
दिवस-रात्र त्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. सहा दिवसात जवळपास १५१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला घरातील व्यक्तीही जिवंत नव्हत्या. प्रशासनाने त्यांचे अंत्यविधी केले. डोंगर कोसळून गाव गाडले गेल्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केली. सरकारने माळीण गावाचं पुनर्वसन केलं. मात्र आता पुन्हा एकदा आजूबाजूच्या गावात भीतीचं वातारण निर्माण झालं आहे.