विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पुणे : मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. पोषण आहारात किडे, मेलेला साप, झुरळ, बेडूक अशा विचित्र गोष्टी आढळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. त्यातच आता पुण्याच्या आश्रम शाळेत देखील असाच एक प्रकार घडला आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना सकाळी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील दुधामध्ये चक्क जिवंत अळ्या सापडल्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून संबंधित प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या आंबेगाव येथील आदिवासी निवासी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यामध्ये दूध देण्यात येतं. या दुधात चक्क जिवंत अळ्या आढळल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. प्रकल्पाअंतर्गत जितक्या आश्रमशाळा येतात, त्या सर्व शाळांना हे दूध वितरीत केलं जातं. मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.
दुधाच्या जुन्या पाकिटांमध्ये अळ्या होत्या, नवीन पाकिटं उघडून पाहिलं असता त्यात देखील अळ्या आढळल्या, अशी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही पाकिटं पुणे आणि नाशिकच्या वरिष्ठ कार्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, येत्या सहा तारखेला पुण्यात होणाऱ्या आंदोलनात हा मुद्दा मांडला जाणार असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना त्रास झाल्यास जबाबदार कोण असणार, हा सवाल निर्माण होत आहे. जे कोण हे दूध पुरवतं, ज्यांनी कोणी कॉन्ट्रक्ट दिलं गेलंय, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.