पुणे : मुंबईत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. (Rain Update) अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही काही धरणक्षेत्रात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यातील (Pune News) पाणलोट धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी (Heavy Rain) होत असून धरणे पूर्ण भरले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून इतर जिल्ह्यांनाही अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरीही खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांजवळ मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ खाल्याने या धरणांतून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून सध्या २७ हजार १६ क्युसेक्स, मुळशीतून २७ हजार ६०९ क्युसेक्स, पवनातून ५ हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून ८ हजार ५० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. तसेच विसर्गाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट
पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.