मनी लाँड्रींगप्रकरणी पुणे, बारामतीसह मुंबईतील कंपन्यांतही सर्च ऑपरेशन
मुंबई : ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. मुंबई, कर्जत, बारामती आणि पुण्यात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. ईडीकडून मनी लाँड्रींगप्रकरणी पुण्याच्या एम. एस. शिव पार्वती साखर कारखाना आणि इतर कंपन्यांच्या खात्यात पैशांचा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. एम/एस. हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि. आणि त्यांचे व्यवस्थापक नंदकुमार तासगांवकर, संजय आवटे आणि राजेंद्र इंगवाले यांच्या बँक लोन फसवणूकप्रकरणी हे अभियान राबवण्यात आले आहे.
ईडीच्या या छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्र डिजिटल पुरावे आणि १९.५० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयने या प्रकरणात सर्व प्रथम गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने पुढे तपास सुरू केला आहे. या कंपन्यांनी १०० कोटीचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्ज मिळवण्याच्या अटीनुसार प्रकल्पासाठी ७१ कोटी रुपये दिले नाहीत, असे ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, कर्ज स्वरुपात घेतलेली रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. त्यानुसार ईडीकडून पुढील तपास केला जात आहे.
कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि सहायक कंपन्यांनी, जसं की एम/एस तासगांवकर कंस्ट्रक्शन लिमिटेड; एम/एस तासगांवकर इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांची सहयोगी एम/एस हायटेक इंजीनियरिंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.च्या माध्यमातून कर्जाच्या रक्कमचा मोठा हिस्सा हडप केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीतून सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झाले असून त्यांनी व्यक्तिगत लाभ मिळवला आहे. याप्रकरणी, सीबीआयसह आता ईडीकडून पुढील तपासणी सुरू आहे.