एकाच स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर ठरली पहिली भारतीय खेळाडू!
पॅरिस : मनू भाकरने (Manu Bhaker) दोन दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) मध्ये १० मीटर एअर पिस्तूलच्या एकेरी प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. पॅरिसमध्ये पहिल्या कांस्यपदकासह मनूने पदकतालिकेत भारताचे खाते उघडले. त्यानंतर आज पार पडलेल्या १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात मनू भाकर व सरबजोत सिंह (Sarabjot Singh) या नेमबाजांच्या जोडीने भारताला आणखी एक कांस्य पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे पॅरिसमधील पहिल्या यशानंतर आता पुन्हा मनू भाकर हिने आणखी एक कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. तसेच भारताला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळवून देणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी काल १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकासाठी पात्र ठरले होते. या दोघांनी पात्रता फेरीत २० अचूक शॉट्स करुन त्याद्वारे ५८० गुण मिळवले होते. या फेरीत सरबजोतने धिमी सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत कोरियन संघाने २०.५ तर भारतीय संघाने १८.८ गुण मिळवले होते. मात्र त्यानंतर मनू व सरबजोतने आपला जोर जोर दाखवून दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीने २१.२ तर कोरियाने १९.९ गुण मिळवले होते. त्यानंतर तिसऱ्या फेरीत भारताने पुन्हा आघाडीवर येत मनू-सरबजोत जोडीने २०.८ तर कोरियन संघाने १९.८ गुण मिळवले.
दरम्यान, पाचव्या फेरीत भारतीय संघ मागे पडला होता. परंतु त्या कालावधीत भारतीय संघ एकूण गुणांच्या बाबतीत पुढे निघून केला होता. अखेरपर्यंत भारतीय जोडीने आघाडी कायम राखून कांस्य पदकाला गवसणी घातली.