आपल्याला निर्जीव वाटणाऱ्या गोष्टीत चैतन्य घालावे ते ज्ञानदेवांनी! आपल्याला रुक्ष, सरळसोट भासणाऱ्या घटनांना सौंदर्य बहाल करावे ते ‘ज्ञानेश्वरी’कारांनीच! संपूर्ण ज्ञानेश्वरीत याचा अनुभव येत राहतो. त्यातही अठरावा अध्याय हा विशेषच होय. यात जागोजागी अशा सुंदर कल्पना सापडतात की, आपण तिथे थांबतो, थबकतो. त्यातील सौंदर्य समजून घेतो. आज पाहूया अशाच खास ओव्या. या ओव्यांचा विषय आहे ‘भगवद्गीतेचा महिमा, मोठेपणा’! वेदांपासून गीतेची निर्मिती झाली आहे; परंतु वेद आणि गीता यांत वेगळेपणा आहे. वेदांपेक्षा गीता उजवी वाटते. याचे कारण काय?
साध्या भाषेत याचे उत्तर द्यायचे तर असे आहे – वेद हे फक्त तीन वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य) यांच्यासाठी आहेत. याउलट गीता ही स्त्री, शूद्र या सगळ्यांसाठी आहे. त्यातील ‘ज्ञान’ हे या साऱ्यांसाठी खुले आहे. याचे वर्णन ज्ञानदेव किती काव्यमय करतात ते ऐकण्याजोगे आहे. ‘वेद संपन्न खरा, परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही. कारण तो (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या) तीन वर्णांच्याच कानी लागला.’ ओवी क्र. १४५७
‘वेदु संपन्नु होय ठाईं। परि कृपणु ऐसा आनु नाहीं।
जे कानीं लागला तिहीं। वर्णांच्याचि॥’
‘याशिवाय जे स्त्रीशूद्रादिक जीव संसारव्यथेने पीडित झालेले आहेत, त्यांचा रिघाव होण्याला सवडच नाही असे म्हणून तो स्वस्थ बसला आहे.’ ओवी क्र. १४५८
‘तर मला असे दिसते की, तो आपला मागील उणेपणा जाऊन, आपल्यास सत्कीर्ती मिळावी या हेतूने, वाटेल त्याने आपले सेवन करावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झाला आहे. ओवी क्र. १४५९
आता पाहा! वेद जणू कोणी जिवंत माणूस आहे अशा पद्धतीने ज्ञानदेवांनी त्याचे वर्णन केले आहे. एखादा माणूस दुसऱ्यांना काही न देणारा असेल की आपण म्हणतो, ‘काय कंजूष आहे तो!’ ज्ञानदेवांनी इथे ‘वेदा’विषयी कंजूषपणाची कल्पना केली. का? कारण तो तीन वर्णांच्याच कानी लागला. ‘कानी लागला’ या कल्पनेतही किती बहार आहे! एखादी गोष्ट गुप्तपणे सांगताना ती कानात सांगितली जाते. इथे वेदांचं वर्तन असेच गुप्तपणाचे आहे.
पुढे काय म्हणतात ज्ञानदेव? स्त्री, शूद्र आदींचे दुःख निवारण करण्यास सवड नाही म्हणून वेद स्वस्थ बसला. काही माणसांची वागणूक अशीच असते, इतरांच्या दुःखाशी सोयरसुतक नसल्यासारखी. वेदही असाच वागला आणि निश्चिंत बसला. अशा वागणुकीमुळे वेदात उणेपणा आला. आपल्यातील उणेपणा समजल्यावर माणूस, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करतो. वेदालाही असे वाटले म्हणून तो गीतारूपाने प्रकट झाला की ज्यायोगे ज्याला इच्छा होईल त्याला आपले सेवन करता यावे. वेदग्रंथांनी कृपणपणा करणे, केवळ तीन वर्णांच्या कानी लागणे, इतरांना ज्ञान न देता स्वस्थ बसणे, मग उणेपणा दूर करण्यासाठी गीतारूपाने प्रकट होणे हे सर्व घटनाक्रम आहेत. एखाद्या माणसाच्या बाबतीत ते घडतात. स्वतःमधील उणीव दूर करून माणसे आपले आणि इतरांचे जीवन उंचावतात. हा विकासक्रम ज्ञानदेव चक्क वेद, गीता याबाबत पाहतात. ज्ञानदेवांच्या या कवित्वशक्तीला आणि गुरू म्हणून समजावण्याच्या रीतीला सविनय प्रणाम!
manisharaorane196@ gmail.com
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…