नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारच्या मते, अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या राजवटीत मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांच्या खात्यासाठी अधिक निधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मंत्रिमंडळातील इतर मातब्बर मंत्र्यांच्या तुलनेत सर्वांधिक निधी नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी मिळाला आहे. गडकरींच्या परिवहन मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात ५,४४,१२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे संरक्षण मंत्रालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी ४,५४,७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भाजपा नेते अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृह खात्याची जबाबदारी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अमित शाह यांच्या गृह मंत्रालयासाठी १,५०,९८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रालयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १,५१,८५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्रालयासाठी २,६५,८०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आरोग्य मंत्रालयासाठी ८९,२८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रालयासाठी १,२५,६३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एस जयशंकर यांच्या परराष्ट्र मंत्रालयासाठी २२,१५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मनोहरलाल खट्टर यांच्या शहरी विकास मंत्रालयासाठी ८२,५७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, ऊर्जा मंत्रालयासाठी ६८,७६९ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. आश्विनी वैष्णव यांच्या आयटी आणि दूरसंचार मंत्रालयासाठी १,१६,३४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे मंत्रालयासाठी २,५२,२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.