मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2024) हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. देशाचा अर्थसंकल्प देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे, असे कौतुक करत विरोधकांनी अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले, याची यादीच फडणवीस यांनी वाचून दाखवली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामधून काहीही मिळालेलं नाही, अशी ओरड महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या अर्थसंकल्पाची थीम पूर्वेकडील राज्याच्या धर्तीवर घेतली. त्यामुळे देशातील काही राज्यांची नावे आली. लगेचच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्प न वाचता घोषणाबाजी केली आणि प्रतिक्रिया दिल्या. पण मला असे वाटते की जनता तेव्हा तुम्हाला निवडून देते तेव्हा एवढी अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत. मी पाहिले तर मला महाराष्ट्रासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्याचे दिसून आले, असे फडणवीस यांनी सांगितले.
अनेक प्रगत देश अर्थव्यवस्थेशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत भारताने ८.२ टक्याची वाढ दाखवली आहे. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करुन देणारी वाढ आहे. २०२३-२४ मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च दुप्पट झाला असून जवळपास ११ लाख कोटी वरून २३ लाख कोटीवर गेला आहे. तसेच आरोग्य क्षेत्राचा खर्च २०१७-१८ च्या तुलनेत आता जवळपास दुप्पट झाला आहे. २.५ लाख कोटीवरून ५.८५ लाख कोटीवर गेला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच वित्तीय तूट देखील कमी होताना दिसत असून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे. तसेच लाभार्त्यांच्या खात्यात ४० लाख कोटी रुपये थेट जमा करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. भारताच्या भविष्यात मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला, युवा, गरीब या चार घटकांना समोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तसेच रोजगाराच्या क्षेत्रात आता अॅप्रेंटशीपची योजना केंद्राने सुरु केली आहे. या योजनेतून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे. तसेच तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्वच क्षेत्रात रोजगार निर्माण होतील, देशात गुंतवणुकीला मोठा फायदा होईल. तसेच मुद्रा लोन १० लाखांपर्यंत कोणत्याही गॅरंटी शिवाय आधी मिळत होते. आता २० लाख रुपयांपर्यंत मुद्रा लोन कोणत्याही गॅरंटी शिवाय मिळणार आहे. एक कोटी कुटुंबांना ३०० युनीट वीज मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
फडणवीस पुढे म्हणाले, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधांसाठी होणार आहे. दीड लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज ५० वर्षांसाठी आणि १५ वर्षांसाठी अशा दोन योजना केंद्राने राज्यांसाठी आणल्या आहेत. तसेच नवी पेन्शन योजनेसंदर्भातही मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना बरोबर घेऊन काही नियम केले आहेत. त्याच धर्तीवर आता केंद्र सरकार देखील पुढे नेण्याचे काम करत आहे. या अर्थसंकल्पात फक्त घोषणांचा पाऊस न पाडता भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले?
⦁ विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : ६०० कोटी
⦁ महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : ४०० कोटी
⦁ सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : ४६६ कोटी
⦁ पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : ५९८ कोटी
⦁ महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : १५० कोटी
⦁ एमयूटीपी-३ : ९०८ कोटी
⦁ मुंबई मेट्रो : १०८७ कोटी
⦁ पुणे मेट्रो : ८१४ कोटी
⦁ नागपूर मेट्रो : ६८३ कोटी
⦁ मुळा मुठा नदी संवर्धन : ६९० कोटी
⦁ दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर : ४९९ कोटी
⦁ एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी : १५० कोटी
⦁ नाग नदी पुनरुज्जीवन : ५०० कोटी