Sunday, March 16, 2025
Homeदेशविरोधकांनी पराभव मान्य करुन लोकहितासाठी सरकारला साथ द्यावी

विरोधकांनी पराभव मान्य करुन लोकहितासाठी सरकारला साथ द्यावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जातेय ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची आहे. देशातील जनतेनं त्यांचा निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांची जबाबदारी आहे की त्यांनी पुढील ५ वर्ष पक्षासाठी नाही तर देशासाठी लढायला हवे. पुढील साडे चार वर्ष देशासाठी समर्पित करा. विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. आज श्रावणी सोमवार आहे, आजपासून एक महत्त्वाचे सत्र सुरु होत आहे. मी देशवासीयांना शुभेच्छा देतो. देश बारकाईने हे पाहतो आहे की अधिवेशन सकारात्मक पद्धतीने कसे पार पडेल. देशाच्या जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया घालणारे हे अधिवेशन असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांनी आता जानेवारी २०२९ मध्ये मैदानात यावे. तुम्हाला ६ महिने जे काही खेळ खेळायचे आहेत. ते खेळा, परंतु तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांच्या प्रगतीसाठी काम करा. २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करत आहोत. मात्र २०१४ ला काही खासदार ५ वर्षासाठी आले, काहींना १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. परंतु खूप खासदारांना संसदेत त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. काही नकारात्मक राजकारण करणाऱ्यांनी त्यांचे अपयश झाकण्यासाठी संसदेच्या सभागृहाचा गैरवापर केला. त्यामुळे नव्या खासदारांना संधी मिळावी. त्यांना बोलायला वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त लोक पुढे येऊ द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

तसेच ज्यांना सरकार चालवण्याचा जनादेश मिळाला, त्यांचा आवाज सभागृहात दाबण्याचा याआधीच प्रयत्न झाला हे सर्वांनी पाहिले. अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. देशातील जनतेने देशासाठी आपल्याला इथे पाठवले आहे, याचा विचार करायला हवा. विरोधकांचा विचार चुकीचा नाही परंतु नकारात्मक विचार वाईट आहे. जनता बारकाईने आपल्या कामाकडे पाहत आहे. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेत एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अधिवेशन आहे. मला, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी हा विषय अभिमानाचा आहे. ६० वर्षांनी देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. भारताच्या लोकशाहीच्या गौरवयात्रेचं हे रुप आहे. तिसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर करणे ही गर्वाची गोष्ट आहे. असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

दरम्यान, मी देशवासियांना जी गॅरंटी दिली आहे, ती प्रत्यक्षात अंमलात आणणारे हे बजेट असेल. अमृतकाळातील हा महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे. आम्हाला ५ वर्ष संधी मिळाली आहे त्याची दिशा ठरवणारा हा बजेट असेल. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पाया रचणारा हा बजेट असणार आहे, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -