मोरीगाव : आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या महापुरामुळे (Assam Floods) अनेक घरे पाण्यात बुडाली असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. जिल्ह्यातील पूरस्थिती आता सुधारत असली तरी त्यांची घरे अजूनही पाण्यात बुडालेली असल्याने पूरग्रस्तांच्या समस्या आणखी गंभीर होत चालल्या आहेत.
अनेक लोक गेल्या पंधरवड्यापासून रस्ते, पूल, बंधारे आणि उंच भागात राहत आहेत. पूराचा फटका जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यातील गगलमारी परिसरातील अनेक ग्रामस्थ आजही गावात पाणी तुंबल्याने रस्त्यावर व बंधाऱ्याचा आसरा घेत आहेत. गगलमारी गावातील रहिवाशांनी सांगितले की, पुराचे पाणी आता कमी होत आहे. परंतु या गावाला जोडणारा रस्ता अजूनही पाण्याने भरलेला आहे. या गावातील अनेक घरांमध्ये अजूनही पाणी तुंबले असून अनेक लोक बंधाऱ्यांवर राहत आहेत. पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार, या वर्षी पुरामुळे ९७ लोकांचा बळी गेला आहे आणि १७ जिल्ह्यांतील ५.११ लाख लोक अजूनही प्रभावित आहेत. पुराच्या पाण्यामुळे २१२३६.४६ हेक्टर पीक क्षेत्र बुडाले आणि ११३२ गावे बाधित झाली आहेत.