नवी दिल्ली : ७ राज्यांतील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने १० जागा जिंकत बाजी मारली आहे. तर भाजपला २ जागा मिळाल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
बिहारमधील रुपौली, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर, नालागढ, मध्य प्रदेशातील अमरवाडा, पंजाबमधील जालधंर पश्चिम, तामिळनाडूतील विक्रवंडी, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला या १३ जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्याचे निकाल शनिवारी जाहीर झाले.
प. बंगालमध्ये तृणमूलचा चारही जागांवर विजय
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. कृष्णा कल्याणी, रायगंज (तृणमूल), मुकूट मनी अधिकारी, राणाघाट दक्षिण (तृणमूल), मधुपर्णा ठाकू, बगदा (तृणमूल), सुप्ती पांडे, मनिकताला (तृणमूल) अशी येथील विजयी उमेदवारांची नावे आहेत.
पंजाबमध्ये आपचा दबदबा
इंडिया आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने पंजाबच्या जालंधर पश्चिमेची जागा जिंकली आहे. येथून आपचे मोहिंदर भगत विजय झालेत. त्यांनी भाजपचे शीतल अंगुराल यांचा सुमारे ३० हजार मतांनी पराभव केला. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला.
मध्य प्रदेशात भाजपला यश
मध्य प्रदेशमधील अमरवाडा येथील पोटनिवडणुकीत भाजपचे कमलेश शहा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धीरेश शहा यांचा ३,२५२ मतांनी पराभव केला.
उत्तराखंडमधील २ जागा काँग्रेसला
उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येथील बद्रीनाथ आणि मंगलौर या जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लखपत बुटोला यांनी सुमारे ५ हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर मंगलौर येथून काँग्रेस उमेदवार काझी मोहम्मद निजामुद्दीन निवडून आले आहेत.
बिहारमध्ये अपक्ष उमेदवार विजयी
बिहारमध्ये अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे सुमारे ८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. येथे जेडीयूला पराभवाचा धक्का बसला आहे.
हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विजयी
हिमाचल प्रदेशातील देहरा येथून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. तर हमीपूर येथील जागा भाजपने मिळवली आहे. येथे भाजपचे आशिष शर्मा विजयी झालेत. तर काँग्रेसचे हरदीप सिंह बावा यांनी नालागढ येथून विजय मिळवला आहे. तामिळनाडूतील विकवंडी जागा डीएमकेचे उमेदवार अन्नीयूर सिया यांनी जिंकली आहे.